घरदेश-विदेशनशीब पोस्टाचे कर्मचारी होते! नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचलं असतं 'ते' पार्सल!

नशीब पोस्टाचे कर्मचारी होते! नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचलं असतं ‘ते’ पार्सल!

Subscribe

वैयक्तिक राग काढण्यासाठी एका व्यक्तीने थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनाच दुर्गंधीयुक्त पार्सल पाठवण्याचा अजब प्रकार केला आहे.

भलत्याच व्यक्तीवरचा आपला वैयक्तिक राग काढण्यासाठी एका महाभागानं थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाच दुर्गंधी येणारं पार्सल पाठवण्याचा पराक्रम केला आहे. राव यांच्यासोबतच त्यांचा मुलगा आमदार के. टी. रामाराव, मुलगी आणि माजी खासदार कविता, तेलंगणाचे पोलीस महासंचालक महेंद्र रेड्डी यांना देखील असेच दुर्गंधी येणारे पार्सल पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पार्सल पाठवताना उस्मानिया विद्यापिठातील दोन प्राध्यापक आणि एका महिलेच्या नावाने बुकिंग करण्यात आले होते. या तिघांनीही पोलिसांकडे आपला पार्सलशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या महाभागाला अटक केल्यानंतर खऱ्या प्रकाराचा उलगडा झाला!

पार्सलसाठी भरले ७ हजार २१६ रुपये

१६ ऑगस्टला ३२ वर्षीय व्यंकटेश्वर ६२ भरलेले लहान-मोठे बॉक्स घेऊन पोस्ट ऑफिसात गेला. संध्याकाळी उशीर झाल्यामुळे पोस्ट ऑफिस तोपर्यंत बंद झालं होतं. त्यामुळे पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ ऑगस्टला व्यंकटेश्वर पुन्हा पोस्टात गेला आणि त्याने हे सर्व बॉक्स पत्ते टाकून पोस्ट कर्मचाऱ्यांच्या हवाली केले. पाठवणाऱ्याची माहिती म्हणून त्याने थेट उस्मानिया विद्यापीठातले २ प्राध्यापक आणि एका महिलेचं नाव-पत्ता टाकला. पार्सल पाठवण्यासाठीचे ७ हजार २१६ रुपये शुल्क देखील भरलं.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यसभेत गाजली कोंबडी आणि अंडी!

..आणि पोस्टाचे कर्मचारी सतर्क झाले!

काही वेळानंतर पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना या बॉक्समधून दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं. त्यांनी बॉक्स उघडून पाहिल्यानंतर आत प्रचंड दुर्गंधी सोडणारा द्रव्य पदार्थ होता. त्यांनी लागलीच हा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी हे बॉक्स ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून दिले. अधिक तपास करून त्यांनी व्यंकटेश्वरला ताब्यात देखील घेतले. त्याच्या चौकशीतून सत्य बाहेर आलं.

काय आहे वास्तव?

बोलारूममधल्या नवभारती कॉलेजमध्ये व्यंकटेश्वरने २००८ ते २०१० या कालावधीमध्ये एमबीएचा अभ्यास केला आहे. यादरम्यान, एका मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र, तिने नकार दिल्यामुळे तिच्याबद्दलचा राग त्याच्या मनात होता. याशिवाय, त्याला कॉलेजमध्ये असताना तो एमबीएच्या परिक्षेत नापास झाला होता. यासाठी उस्मानिया विद्यापीठातले दोन प्राध्यापक जबाबदार होते, असं त्याला वाटायचं. यातून या तिघांची बदनामी करण्यासाठी म्हणून त्याने हा प्रकार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला असला, तरी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांमुळे एक दुर्गंधीयुक्त पार्सल मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचण्यापासून रोखता आलं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -