Britain Covid19 : ब्रिटनमध्ये मास्क मुक्ती ! वर्क फ्रॉम होमबाबत PM बोरिस जॉन्सन यांची मोठी घोषणा

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं आहे. कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटने सुद्धा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाचं सावट आणि ओमिक्रॉनचं संकट असूनही ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मास्क आणि वर्क फ्रॉम होमबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील ओमिक्रॉनची स्थिती पाहता अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं जाणार नाही, असं बोरिस जॉन्सन म्हणाले.

मास्कचा अनिवार्य वापर करण्याचा नियम सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक विनामास्क कुठेही फिरू शकतात. शाळेतील वर्गांमध्ये सुद्धा मास्क घालणं अनिवार्य नसणार आहे. याबाबतही सरकारकडून निर्बंध उठवण्यात आले आहेत.

कोविड-१९ चे निर्बंध शिथिल केले जाणार

देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा आलेख चढता आहे. तरीदेखील कोविड-१९ चे निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. यासाठी आज सकाळीच मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, बूस्टर डोसची मोहीम आणि सावधगिरीच्या उपायांना मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहिला असता, पुढील आठवड्यापासून अनेक निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात, असं बोरिस जॉन्सन संसदेत म्हणाले.

ओमिक्रॉन व्हेरियंटला हलक्यात न घेणेच शहाणपणाचं असल्याचं जागितक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे सर्व देशांना सतर्क राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.

देशात २ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. दररोज २ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. आज देशात दैनंदिन रुग्णसंख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३.६३ टक्क्यांनी ओमिक्रॉनबाधित वाढले आहेत. देशात ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत ३.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.आतापर्यंत देशात ९ हजार २८७ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.