बंगळुरू : 23 ऑगस्टला चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 26 ऑगस्ट) इस्रोच्या वैज्ञानिकांची इस्रो सेंटरमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी इस्रो सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रोच्या प्रमुखांकडून स्वागत करण्यात आले. यानंतर चांद्रयान 3 चे नेतृत्व केलेले वैज्ञानिक या मोहीमेचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांद्रयान 3 बाबतची संपूर्ण माहिती दिली. चांद्रयान 3 अवकाशात कशा पद्धतीने झोपावले आणि त्यानंतर त्याने कशा पद्धतीने चंद्रावर लँडिंग केले याबाबतची संपूर्ण माहिती त्यांना दिली. चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या देशांच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांनी परदेश दौऱ्यावरून येताच आज थेट बंगळुरू गाठले. यावेळी त्यांची बंगळुरूमध्ये रॅली देखील काढण्यात आली. (PM Modi: 23rd August will now be celebrated as ‘National Space Day’)
हेही वाचा – ISRO : पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट, चांद्रयान 3 लॅंड झालेल्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव
इस्रोच्या सेंटरमधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी भारतात येताच लवकरात लवकर तुमच दर्शन करायच होत. तुम्हा सगळ्यांना सलाम करायचा होता. सॅल्युट तुमच्या परिश्रमाला, सॅल्युट तुमच्या हिमतीला, तुमच्या जिद्दीला सलाम, तुम्ही देशाला ज्या उंचाीवर घेऊन गेलात हे साधारण यश नाहीय. अवकाशात भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा हा शंखनाद आहे. माझ्या डोळ्यासमोर 23 ऑगस्टचा तो दिवस, प्रत्येक सेकंद सतत येतोय. ज्यावेळी चंद्रावर टचडाऊन झाले, त्यावेळी इस्रो सेंटर, संपूर्ण देशात लोकांना जो आनंद झाला, ते दृश्य कोण विसरेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले.
काही स्मृती अमर असतात, काही क्षण अमर झाले. ते प्रेरणादायी क्षण होते. प्रत्येक भारतीयाला वाटत होते, तो विजय आपल्या स्वत:चा आहे. प्रत्येक देशवासियाला वाटत होते की, आपण मोठ्या परीक्षेत पास झालो आहोत, आज शुभेच्छा दिल्या जात आहेत. संदेश दिला जातो, हे सगळ शक्य झाले, ते इस्रोच्या वैज्ञानिकांमुळे, असे सांगत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी तुम्हा सगळ्यांचे कौतुक करेन तेवढे कमी आहे. मी तो फोटो बघितला ज्यात मून लँडरने चंद्रावर मजबुतीने पाय रोवले आहेत. एकप्रकारे विक्रमचा विश्वास आहे, दुसऱ्याबाजूला प्रज्ञानचा पराक्रम आहे. प्रज्ञान चंद्रावर पदचिन्ह उमटवतोय, वेगवेगळ्या कॅमेऱ्यामधून रिलीज झालेले फोटो बघितले हे अद्भभूत आहे.
तसेच, भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट. त्यामुळे यापुढे हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मंगळयान आणि चांद्रयानचे यश आणि गगनयानच्या तयारीने देशाला एक नवे चैतन्य दिले आहे. आज भारतातील थोरामोठ्यांच्या तोंडी चांद्रयानाचे नाव आहे. आज भारतातील लहान मूलही आपल्या वैज्ञानिकांमध्ये भविष्य पाहत आहे. संपूर्ण भारताच्या पिढीला तुम्ही जागृत करून ऊर्जा दिली, हेही तुमचे कर्तृत्व आहे. तुम्ही तुमच्या यशाची खोल छाप सोडली आहे. आजपासून रात्रीच्या वेळी चंद्र पाहणाऱ्या कोणत्याही लहान मुलाला विश्वास बसेल की, माझा देश जसा चंद्रावर पोहोचला आहे, तेवढीच हिंमत आणि चैतन्य त्या मुलामध्येही आहे. मुलांमध्ये स्वप्नांची बीजे तुम्ही पेरली आहेत. ती वटवृक्ष बनतील आणि विकसित भारताचा पाया बनतील. तरुण पिढीला सतत प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Interacting with our @isro scientists in Bengaluru. The success of Chandrayaan-3 mission is an extraordinary moment in the history of India’s space programme. https://t.co/PHUY3DQuzb
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2023