योगच्या सामर्थ्याची चाचपणी करायची आहे त्यांनी…, संशोधकांना पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरतच्या अन्वी विजय जांजारुकिया हिचा दाखला देत योगाभ्यासाचे महत्त्व विषद केले. ज्यांना योगच्या सामर्थ्याची चाचपणी करायची आहे त्यांनी पुढाकार घेऊन अन्वीच्या या यशाचे अध्ययन करावे आणि योगचे सामर्थ्य जगासमोर आणावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

डाऊन सिंड्रोमची रुग्ण असलेल्या अन्वीचे जीवन योगाभ्यासामुळे पूर्णपणे बदलले आहे. तिने वयाच्या 11व्या वर्षीच योगाभ्यास सुरू केला. अन्वीने आतापर्यंत योगविषयक 42 स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तिने राष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत. तिने एकूण 51 पदके मिळविली आहेत. ती 112हून अधिक योगप्रकार करू शकते. ती याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटली होती. आपल्या ‘मन की बात’च्या 93व्या भागात अन्वीबरोबरच्या या भेटीचा उल्लेख केला. मी काही दिवसांपूर्वी सुरतमधील अन्वीला भेटलो. अन्वी आणि अन्वीचा योग यांच्यासोबाबत झालेली माझी भेट खूपच स्मरणीय होती, असे मोदी म्हणाले.

अन्वी जन्मतःच डाऊन सिंड्रोमची रुग्ण आहे आणि लहानपणापासूनच ती हृदयरोगाचा सामना करत आहे. ती केवळ तीन महिन्यांची असताना तिची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. इतकी सगळी संकटे येऊन देखील अन्वीने आणि तिच्या आई-बाबांनी कधीच हार मानली नाही. अन्वीच्या आई-वडिलांनी डाऊन सिंड्रोमबाबत सर्व माहिती गोळा केली आणि अन्वीला अधिकाधिक आत्मनिर्भर करण्याचा निश्चय केला. त्यांनी अन्वीला पाण्याचा ग्लास कसा उचलायचा, बुटांची नाडी कशी बांधायची, कपड्यांची बटणे कशी लावायची अशा छोट्या-छोट्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, चांगल्या सवयी कोणत्या या सर्व गोष्टी त्यांनी तिला खूप धीराने शिकवल्या, असे सांगत मोदी यांनी तिच्या माता-पित्यांचे कौतुक केले.

अन्वीने देखील या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी दाखवलेली इच्छाशक्ती, आपले कौशल्य दाखविले. या सगळ्यामुळे तिच्या आई-वडिलांना देखील खूप बळ मिळाले. त्यांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अन्वी आपल्या दोन पायांवर देखील व्यवस्थित उभी राहू शकत नव्हती, परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील तिच्या आई-वडिलांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. पहिल्यांदा जेव्हा ती योग शिक्षकांकडे गेली तेव्हा ते खूपच संभ्रमात होते की, ही चिमुरडी योग करू शकेल की नाही? तिने आपल्या आईसोबत योगाभ्यास करायला सुरुवात केली आणि आता तर ती योग निपुण झाली आहे. योगने अन्वीला नवीन आयुष्य प्रदान केले आहे. अन्वीने योग आत्मसात करून आयुष्य आत्मसात केले आहे, असे कौतुक त्यांनी केले.

योगमुळे अन्वीच्या शारीरिक आरोग्यात देखील सुधारणा झाली आहे आणि आता तिला खूपच कमी औषधे घ्यावी लागतात. योगमुळे अन्वीला झालेल्या लाभांचा, देश-परदेशातील ‘मन कि बात’च्या श्रोत्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा, अशी माझी इच्छा आहे. अन्वी हे एक उत्तम उदाहरण आहे, असे मला वाटते. ज्यांना योगच्या सामर्थ्याची चाचपणी करायची आहे, त्यांनी पुढाकार घेऊन अन्वीच्या या यशाचे अध्ययन करावे आणि योगचे सामर्थ्य जगासमोर आणावे. असे कोणतेही संशोधन जगभरातील डाऊन सिंड्रोमने पीडित मुलांसाठी खूपच फायदेशीर ठरेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूपच फायदेशीर आहे हे आता सर्व जगाने मान्य केले आहे. विशेषतः मधुमेह आणि रक्तदाबाशी निगडित समस्या सोडवण्यात योगची खूपच मदत होते. योगची हीच ताकद लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले, असे ते म्हणाले.