घरदेश-विदेशकुटुंबासाठी घटनेचा दुरूपयोग - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कुटुंबासाठी घटनेचा दुरूपयोग – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

कुटुंबियांसाठी घटनेचा दुरूपयोग केला गेला. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी लादण्याच्या इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर टीका केली आहे. तसेच गांधी घराण्याची खुर्ची गेल्यावर संविधान धोक्यात येते अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टीका केली आहे.

‘केवळ कुटुंबासाठी घटनेचा दुरूपयोग केला गेला’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर टीका केली आहे. मुंबईमध्ये आयोजित लोकशाही आणि आणीबाणी याविषयावरील संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील व्यासपीठावर उपस्थित होते. इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी ही देशासाठी काळा दिवस होता. आणीबाणीमुळे संपूर्ण देशामध्ये भीतीचे वातावरण होते. आणीबाणी, महाभियोग ही काँग्रेसची मानसिकता असून आणीबाणीमध्ये संपूर्ण देशला तुरूंगाचे रूप प्राप्त झाल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तर, काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात होती. काँग्रेसने न्यायव्यवस्थेचा केव्हाच विचार केला नसल्याची टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. ‘गांधी घराण्याची खुर्ची जाणार म्हटल्यावर देश संकटामध्ये येतो’ अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्याला देखील लक्ष्य केले. दरम्यान, आजचा काळा दिवस हा काँग्रेसविरोधी नसल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शिवाय, स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे केले गेले अशी टीका देखील यावेळी मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्यावर केली.

संविधानाप्रति आदर

आम्हाला संविधानाप्रति संपूर्ण आदर आहे. देशात अत्याचाराच्या घटना झाल्या की मोदींच्या नावाने घाबरवले जाते अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही ६० वर्षे सत्ता भोगलात पण एकदाही संविधान दिवस साजरा केला नाही.मात्र भाजपने संविधान दिवस साजरा करत संविधानाप्रति आदर व्यक्त केला आहे. संविधानाबद्दल काँग्रेसला आस्था नसून, संविधान केवळ पुस्तक नाही तर देशाचे भविष्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच लोकशाही केव्हाच संपवता येणार नसल्याचे देखील मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

देशातील सर्वांना समान हक्क

देशातील सर्वांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. मग मुस्लिम महिलांसाठी वेगळा न्याय का? त्यांच्यावर होणारा अन्याय का सहन करायचा? अशा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक विषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली. तर आपली वोट बँक संपेल अशा भीतीपोटी काँग्रेस मुस्लिमांना भाजपविरोधी भडकावत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधक लक्ष्य

निवडणुकांमध्ये भाजप विजयी झाल्यावर ईव्हीएमबद्दल शंका विचारल्या जातात. पण, कर्नाटकमध्ये तुम्हाला ईव्हीएम नाही आठवले का? अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांना ईव्हीएमच्या टीकेवरून उत्तर दिले आहे. शिवाय, ४०० खासदार असणारी काँग्रेस ४४वर आली याचा देखील काँग्रेसने विचार करावा अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -