PM Modi On Budget 2022 : गरिबांचा व्होटबँक म्हणून वापर झाला -पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘अर्थसंकल्प आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी बजेटमधील अनेक मुद्द्यावर भाष्य केले. तसेच पीएम मोदींनी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील पैलू आमच्यासमोर अतिशय चांगल्या पद्धतीने अल्पावधीत मांडल्याचे म्हणत कौतुक केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींना गरिबांची ताकद कोणालाच कळली नाही, त्यांचा राजकारणात व्होट बँक म्हणून वापर झाल्याचे म्हणत विरोधकांवर पलटवार केला आहे.

“गरिबांचा व्होटबँक म्हणून वापर झाला”

यावेळी पीएम मोदी म्हणाले की, गरिबांची ताकद कोणालाच कळलीच नाही, त्यांचा राजकारणात व्होट बँक म्हणून वापर झाला. जन धन खाते, घर मिळाल्याने त्यांना प्रोत्साहन मिळतेय. सरकार जे घर बनवून देतंय त्यामुळे तो गरीब लखपती होतो. जवळपास ३ कोटी लोकांना पक्की घरं देऊन आम्ही लखपती बनवले आहेत. महिला या बहुतांश घरांच्या मालक आहेत, सामाजिक न्याय ही आमची जबाबदारी मानली आहे. गरीब, मध्यमवर्गीयांना मूलभूत सुविधा पुरविण्यावर अर्थसंकल्पाचा भर आहे. गरिबांना मूलभूत गोष्टी मिळाल्या तर तो आपली शक्ती देशाच्या विकासासाठी खर्च करतो.”

“भारताला स्वावलंबी बनवण्यासोबतच आधुनिक भारताची पायाभरणी करणेही गरजेचे”

“अर्थसंकल्पात असे अनेक विषय आहेत, जे कोणत्याही भाषणात समाविष्ट होऊ शकत नाहीत. पण त्यामागील विचार लोकांना सांगणे हे माझे कर्तव्य आहे. अनेक बदल होण्याची शक्यता आहे. याची सुरुवातीची चिन्हेही दिसू लागली आहेत. देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात आहे. सध्या देश 100 वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोनाने जगासमोर अनेक आव्हाने आणली. जग एका चौरस्त्यावर उभे आहे जिथे टर्निंग पॉइंट निश्चित आहे. आता जे जग असेल ते पूर्वीसारखे राहणार नाही. महायुद्धानंतर जग जसे बदलले तसे जगात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. याची सुरुवातीची चिन्हेही दिसू लागली आहेत. भारताला स्वावलंबी बनवण्यासोबतच आधुनिक भारताची पायाभरणी करणेही गरजेचे आहे.” असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

“अर्थसंकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अर्थसंकल्पातून देशाला आधुनिकतेकडे नेण्याचे काम करण्यात आले आहे. गेल्या सात वर्षांत घेतलेले निर्णय, जी धोरणे झाली, पूर्वीच्या धोरणांतील चुका सुधारल्या गेल्या, त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सातत्याने विस्तारत आहे. सात वर्षांपूर्वी जीडीपी एक लाख 10 हजार कोटी होता, आज भारताचा जीडीपी सुमारे 2 लाख 30 हजार कोटी आहे.” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

“9 कोटी ग्रामीण कुटुंबांना ‘नल से जल’ ही सुविधा”

“पाणी हे जीवन आहे, हे ऐकायला बरं वाटतं. मात्र पाण्याअभावी महिला व शेतकऱ्यांची मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागतेय. आम्ही 9 कोटी ग्रामीण कुटुंबांना नल से जल ही सुविधा दिली आहे. यावर्षी सुमारे 4 कोटी ग्रामीण घरांना पाईपने नळ जोडणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.” अशी मोदी म्हणाले.

“सीमावर्ती (शेवटच्या) गावांतील लोकांची ताकद आपण ओळखली असावी. त्यांची देशभक्ती पाहण्यासारखी आहे. तेथून होणारे स्थलांतर थांबविण्याचे काम केले जाईल. तेथे वीज, पाणी सुविधांसाठी (व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम) बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. यातून या क्षेत्रांना पर्यटनस्थळ बनवता येईल.” अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“देशाच्या संरक्षणासाठी पर्वतमाला प्रकल्पाची घोषणा”

“देशाच्या संरक्षणाशी संबंधित आणखी एका मोठ्या पर्वतमाला प्रकल्पाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना तसेच लष्कराला डोंगराळ भागात जाण्यास मदत होणार आहे. हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लेह-लडाख, ईशान्येकडील राज्यांना त्याचा लाभ मिळेल.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

“किसान ड्रोनची घोषणा”

“शेतकऱ्यांवरील बोजा कमी झाला पाहिजे. शेती रसायनमुक्त आणि तंत्रज्ञानपूरक करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पहिली किसान रेल चालवण्यात आली. आता किसान ड्रोनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ड्रोन व इतर संबंधित यंत्रणा शेतकऱ्यांना शेतातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मदत होणार आहे. उत्पादनाचा रिअलटाइम डेटा देखील उपलब्ध असेल.” अशी माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली आहे.