नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर देशभरातील भारतीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विकसित भारत बनविण्याचा संकल्प करत आपल्या भाषणातूनआत्मनिर्भर भारत, मणिपूर हिंसाचार, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवाशक्ती, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या दुसऱ्या टर्ममधील हे शेवटचे भाषण होते, त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. यावेळी पंतप्रधानांनी देशातील विकासाबाबतची माहिती तर दिलीच, पण यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. गेल्या 75 वर्षांपासून काही विकृती या देशात घर करून बसल्या आहेत, असे म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष केले. (PM Narendra Modi targeted the opposition)
हेही वाचा – PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केली ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा, म्हणाले…
लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करत असेल, तेव्हा भारत विकसित झाला असेल. हे मी देशाच्या सामर्थ्याच्या जोरावर म्हणतोय. सर्वात जास्त 30 हून कमी वयाच्या युवा शक्तीच्या जोरावर, महिलांच्या जोरावर म्हणत आहे. पण त्यामध्ये काही अडथळे आहेत. काही विकृती गेल्या 75 वर्षांत देशात घर करून बसल्या आहेत. आपल्या समाजव्यवस्थेचा असा हिस्सा बनल्या आहेत, की कधीकधी आपण डोळे बंद करून घेतो. पण आता डोळे बंद करण्याची वेळ नाही आहे. जर संकल्प पूर्ण करायचा असेल, तर आपल्याला तीन वाईट प्रवृत्तींचा सामना करणे गरजेचे आहे.
या तीन वाईट प्रवृत्तींपैकी पहिली वाईट प्रवृत्ती म्हणजे भ्रष्टाचार. आपल्या देशाच्या सर्व समस्यांच्या मुळाशी भ्रष्टाचाराने वाळवीप्रमाणे देशाच्या सामर्थ्याला पोखरून काढले आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती, त्याच्याविरोधात लढा प्रत्येक क्षेत्रात होणे आवश्यक आहे. हा मोदींचा शब्द आहे. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहीन, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दुसरी विकृती म्हणजे घराणेशाही. आपल्या देशाला घराणेशाहीन पोखरून ठेवले आहे. घराणेशाहीमुळे देश जोखडामध्ये बांधला गेला आहे. यामुळे देशातील अनेक लोकांचे अधिकार हिसकावून घेतले गेले आहे. तर द्वेषभावना ही तिसरी विकृती आहे. या द्वेषभावनेने देशाच्या मूलभूत विचाराला, देशाच्या सर्वसमावेशच चारित्र्याला डाग लावला आहे. उद्ध्वस्त करून ठेवले आहे, असेही मोदींकडून सांगण्यात आले.
आपल्याला या तीन वाईट प्रवृत्तींविरोधात पूर्ण सामर्थ्यानिशी लढायचे आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण ही आव्हाने आपल्यासमोर आहेत. या गोष्टी आपल्या देशाच्या लोकांमधल्या आकांक्षा दाबून टाकतात. लोकांचे शोषण करतात. आपले गरीब, दलित, मागास, पसमांदा, आदिवासी, महिला आपण सगळ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी या तीन वाईट प्रवृत्तींशी लढून मुक्ती मिळवायला हवी. आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात संतापाचे वातावरण बनवायला हवे, असे मोदींनी नागरिकांना संबोधित करताना म्हटले आहे.
आज देशाच्या लोकशाहीत एक अशी विकृती आहे जी कधीच भारताच्या लोकशाहीला मजबुती देऊ शकत नाही. ती म्हणजे घराणेशाहीवादी पक्ष. त्यांचा मूलमंत्र आहे पार्टी ऑफ द फॅमिली, बाय द फॅमिली अँड फॉर द फॅमिली. त्यांचा जीवनमंत्रच हा आहे की त्यांचा राजकीय पक्ष कुटुंबाचा, कुटुंबाकडून व कुटुंबासाठी चालावा. घराणेशाही प्रतिभेची शत्रू असते. त्यामुळे घराणेशाहीचे उच्चाटन देशाच्या लोकशाहीच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.