काँग्रेसच्या काळात दहशतवाद, हिंसाचार वाढला; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. २००४ ते २०१४ या काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते. संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता. तसेच काँग्रेसच्या काळात देशात दहशतवाद आणि हिंसाचारही वाढल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला.

दहा वर्षांच्या काळात भारताचा आवाज ऐकायला कुणीही तयार नव्हतं. पण त्यानंतर २०१४ पासून देशाचे सामर्थ्य वाढले आणि जगभरात देशाचे नाव उंचावले. विरोधकांच्या निराशेचे कारण म्हणजे देशाची क्षमता वाढत आहे. देशाचे सामर्थ्य वाढत आहे. २००४ ते १४ पर्यंत यांना मोठ्या प्रमाणात संधी होती. परंतु यूपीए सरकारने ही संधी हातातून घालावली, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

एलओसी आणि एलएसीवर सुरक्षा वाढवण्याची गरज होती. परंतु हे सरकार घोटाळ्यात त्रस्त होते. ज्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ होत होती. तेव्हा हे २ जी घोटळ्यात अडकले होते. सिव्हिल न्युक्लिअर करार झाला होता. तेव्हा हे कॅश फॉर व्होटमध्ये अडकले होते. यांनीच हे खेळ सुरू ठेवले आणि देशाला अंधारात ठेवले, असं मोदी म्हणाले.

अनेकांनी आपली मते येथे मांडली. प्रत्येकाचं बोलणं ऐकताना हेही लक्षात येतं की कोणाकडे किती क्षमता आहे. ते किती समजूतदार आहेत आणि कोणाचा हेतू काय आहे. काही लोकांच्या भाषणानंतर इकोसिस्टम उसळत होती. समर्थक उड्या मारत होते, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.


हेही वाचा : ‘वो अब चल चुके है…’, शायरीतून मोदींचा काँग्रेसला टोला