नवी दिल्ली : संविधानाच्या 75 वर्षांच्या निमित्ताने लोकसभेत दोन दिवसांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी त्यांच्या सरकारचे 11 संकल्प वाचून दाखवले. परंतु, त्याआधी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने एका मताने पराभव स्वीकारत कशा पद्धतीने राजीनामा दिला, याची आठवण सभागृहाला करून दिली. तर, बाजारात माल तेव्हाही विकला जात होता, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. (PM Narendra Modi Constitution discussion and Modi Government 11 resolutions)
संसदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केवळ एका मतामुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सरकार सोडावे लागले होते. तेही असंवैधानिक कृती करू शकले असते, पण नैतिकतेने पराभव स्वीकारला. 1996 मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष उदयाला आला. राष्ट्रपतींनी संविधानाच्या भावनेनुसार सर्वांत मोठ्या पक्षाला पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी बोलावले. त्यानंतर 13 दिवस सरकार चालले. जर संविधानाच्या स्पिरिटप्रती आमच्या भावना नसत्या तर आम्हीही सत्तासूख भोगू शकत होतो. पण अटल बिहारी वाजपेयींनी सौदेबाजीचा मार्ग स्वीकारला नाही. संविधानाचा मार्ग स्वीकारला आणि 13 दिवसांनंतर राजीनामा देणे त्यांनी स्वीकारले, अशी आठवण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितली.
तसेच, एवढेच नव्हे तर 1998 मध्ये एनडीएचे सरकार होते. परंतु, आम्ही नाही तर कोणी नाही असा या कुटुंबाचा (गांधी कुटुंब) खेळ चालला होता. त्यावेली मतदान झाले. बाजारात माल तेव्हाही विकला जात होता. परंतु, संविधानाच्या भावनेप्रती समर्पित अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने एका मताने पराभव स्वीकारला, राजीनामा दिला. पण असंवैधानिक कृत्य केले नाही. हा आमचा इतिहास आणि संस्कृती आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या 11 संकल्पाचे संसदेत वाचन करून दाखवले.
मोदी सरकारचे 11 संकल्प…
- नागरीक असो वा सरकार सर्वांनी आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे
- प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजाला विकासाचा लाभ मिळाला पाहिजे. सर्वांच्या साथीने, सर्वांचा विकास झाला पाहिजे.
- भ्रष्टाचाराच्या प्रती शून्य सहिष्णुता असावी. भ्रष्टाचाऱ्याची सामाजिक स्वीकार्यता नसली पाहिजे.
- देशाचा कायदा, नियम, परंपरांचे पालन करण्यास देशाच्या नागरिकांना गर्व असला पाहिजे.
- गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती असावी.
- देशाच्या इतिहासावर गर्व असावा
- देशाच्या राजकारणात घराणेशाहीतून मुक्ती मिळो..
- संविधानाचा सन्मान व्हावा. संविधानाचे हत्यार बनू नये.
- संविधानाच्या भावनेप्रती समर्पण ठेवून ज्यांना आरक्षण मिळत आहे ते कोणी रोखू नये.
- संविधानाच्या निहित भावना We the People हा मंत्र घेऊन पुढे जाऊ… विकसित भारताचे स्वप्न सदनातील प्रत्येकाचे असलं पाहिजे.
- 2047 मध्ये भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत असला पाहिजे