Homeदेश-विदेशPM Narendra Modi : काँग्रेसच्या डोक्यावरील हे पाप पुसले जाणार नाही, मोदींचे...

PM Narendra Modi : काँग्रेसच्या डोक्यावरील हे पाप पुसले जाणार नाही, मोदींचे टीकास्त्र

Subscribe

इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीची आठवण करून देत हे काँग्रेसचे सर्वात मोठे पाप असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसच्या डोक्यावरील हे पाप कधीच पुसले जाणार नसल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : संविधानाच्या 75 वर्षांच्या निमित्ताने लोकसभेत दोन दिवसांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. या भाषणातून त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीची आठवण करून देत हे काँग्रेसचे सर्वात मोठे पाप असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसच्या डोक्यावरील हे पाप कधीच पुसले जाणार नसल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसने 75 वर्षांमध्ये संविधानाची हत्या केल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी संसदेतील भाषणातून केला. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत शनिवारी (ता. 14 डिसेंबर) साधारणतः पावणे दोन तास भाषण केले. (PM Narendra Modi criticized Congress for imposing emergency as its biggest sin)

संसदेत भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, भारतीय राज्यघटना स्वीकारून 75 वर्षे पूर्ण झाले आहेत. आपल्याकडे 25 वर्षाचे देखील एक महत्व असते. तसेच 50 वर्षाचे देखील असते, आणि 60 वर्षाचे देखील एक महत्व असते. मात्र, आपण जर इतिहासाकडे वळून पाहिले तर, जेव्हा देश संविधानाचे 25 वर्ष पूर्ण करत होता, तेव्हा आपल्या देशात संविधान हटवण्याचा प्रयत्न झाला. भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. सर्व संविधानिक व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. देशाला एकप्रकारे जेलखाना बनवण्यात आले होते. सर्वांचे हक्क हिरावून घेतले गेले होते. प्रेसच्या स्वातंत्र्यावर टाळे लावले गेले. मात्र, काँग्रेसच्या डोक्यावर लागलेले हे पाप कधीही धुतले जाणार नाही. जगभरात जेव्हा-जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा-तेव्हा हे काँग्रेसच्या डोक्यावरचे हे पाप दिसेल, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला.

हेही वाचा… PM Narendra Modi : नेहरू ते राजीव गांधी हे सर्वच…, संविधानाच्या चर्चेतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

तसेच, काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. 60 वर्षात 75 वेळा संविधान बदलण्यात आले. जे बीज देशाच्या पहिल्या पंतप्रधांनांनी रोवले होते, त्या बीजाला खतपाणी घालण्याचे काम आणखी एका पंतप्रधानांनी केले. त्यांचे नाव होते इंदिरा गांधी. 1971 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला. त्या निर्णयासाठी संविधान बदलले गेले आणि 1971 मध्ये संविधानात तरतूद केली गेली. त्यांनी देशाच्या न्यायालयाचे पंख कापून टाकले होते. संसद संविधानाच्या कोणत्याही कामामध्ये हस्तक्षेप करू शकते आणि त्याकडे न्यायालय पाहूही शकत नाही, अशी ती तरतूद होती. न्यायालयाचे हे अधिकार काढून टाकले होते. हे पाप 1971 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी केले होते, असा आरोप यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला.


Edited By Poonam Khadtale