नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा दरारा हा जगभरातील इतर नेत्यांपेक्षा कायमच वेगळा असल्याचे नेहमीच सांगण्यात येत असते आणि त्याचेमुळे एका अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रियतेमध्ये पुन्हा एकदा अव्वल ठरले आहेत. मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरच्या अहवालानुसार, पंतप्रधान मोदींना 76 टक्के भारतीयांचा पाठिंबा आहे, तर केवळ १८ टक्के भारतीय त्यांच्या विरोधात आहेत. मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील एकूण 22 देशांच्या प्रमुखांच्या लोकप्रियतेबाबतचे मूल्यांकन केले. यामध्ये भारत देशाव्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या प्रमुख देशांच्या नेत्यांचा समावेश आहे. (PM Narendra Modi is still at number one in popularity)
हेही वाचा – भाजपा नेत्यांना अनुदान सोडण्यास कधी सांगणार? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल
मॉर्निंग कन्सल्ट ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरच्या अहवालात, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकावर आहेत. तर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सेओर युल शेवटच्या स्थानावर आहेत. या यादीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो दहाव्या क्रमांकावर आहेत. सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर स्विस राष्ट्राध्यक्ष अलेन बेर्सेट 64 टक्क्यांनी दुसर्या स्थानावर आहेत, मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 61 टक्क्यांसह तिसर्या स्थानावर आहेत, ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा हे चौथ्या क्रमांकावर असून 49 टक्के लोकांनी त्यांनी पसंती दर्शविली आहे. तर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे 48 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जर्मनीचे चांसलर ओलोफ सोल्झ यांचा मात्र पहिल्या 10 क्रमांकात सुद्धा नंबर लागले नसल्याचे समोर आले आहे. मॉर्निंग कन्सल्ट ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरच्या अहवालानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षन बायडन 40 टक्क्यांसह 7 व्या क्रमांकावर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक 27 टक्के लोकप्रियतेसह 15 व्या क्रमांकावर आहेत. तर जर्मनीचे चांसलर ओलोफ सोल्झ 7यांना 25% पसंती मिळाली असून ते 17व्या क्रमांकावर आहेत. तसेच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 24 टक्के पसंती मिळवून 19 व्या स्थानावर आहे. या यादीत स्पेन (8व्या), आयर्लंड (9व्या), बेल्जियम (11व्या), पोलंड (12व्या), स्वीडन (13व्या), नॉर्वे (14व्या), ऑस्ट्रिया (16व्या), जपान (18व्या), नेदरलँड्स (20व्या) आणि झेक प्रजासत्ताक यांचा समावेश आहे.
या अहवालात नमूद केल्यानुसार, ही आकडेवारी 6 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. या सात दिवसांमध्ये जो काही कायम बदलत राहणारा अहवाल समोर आला आहे, त्याची एकंदरित सरासरी काढून ही आकडेवारी आणि पसंती क्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पॉलिटिकल इंटेलिजन्स हे मॉर्निंग कन्सल्टचे एक व्यासपीठ आहे, जे राजकीय निवडणुका, निवडून आलेले अधिकारी आणि मतदानाच्या मुद्द्यांवर रिअल-टाइम मतदान डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट दररोज 20 हजाराहून अधिक जागतिक मुलाखती घेते.