PM Narendra Modi : मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणी विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर आज (10 ऑगस्ट) आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, आपल्या तरुण पिढीमध्ये संकल्प यशापलिकडे नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे या कालावधीचा प्रभाव पुढील हजार वर्षांपर्यंत राहील, असे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi Many opportunities in a century impact of this era will last for thousands of years Modi)
मोदी म्हणाले की, देशाच्या इतिहासात अशी वेळ आली आहे, जेव्हा देश जुने निर्बंध तोडून नव्या उर्जेने पुढे जाण्यासाठी पावले उचलत आहे. एकविसाव्या शतकाबरोबरच हा काळ आपल्यासाठी संधी घेऊन आला आहे. आपण अशा काळात आहोत, जे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. मला आत्मविश्वासाने सांगायचे आहे की, या काळाचा प्रभाव पुढील हजार वर्षांपर्यंत राहील.
हेही वाचा – PM Modi : ‘मणिपूरवर चर्चा होऊ शकली असती, पण…’; मोदींनी विरोधकांवर केला हल्लाबोल
संकल्प यशापलिकडे नेण्याची क्षमता आपल्या तरुण पिढीमध्ये
140 कोटी देशवासीयांचे प्रयत्न आणि सामर्थ्य येत्या एक हजार वर्षांसाठी मजबूत पाया घालणार आहे. म्हणूनच या काळात आपल्या सर्वांवर खूप मोठी जबाबदारी आहे. अशावेळी आपल्या सर्वांचे लक्ष एकच असले पाहिजे, देशाचा विकास, स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प. ही काळाची गरज असल्याचेही म्हणताना मोदी म्हणाले की, 140 कोटी देशवासीयांची सामूहिक शक्ती आपल्याला त्या उंचीवर नेऊ शकते. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. संकल्प यशापलिकडे नेण्याची क्षमता आपल्या तरुण पिढीमध्ये आहे, असे मोदी म्हणाले.
भारतातील तरुणांना आम्ही घोटाळेमुक्त सरकार दिले
मोदी म्हणाले की, 2014 मध्ये तीस वर्षांनंतर देशातील जनतेने पूर्ण बहुमताने भाजपाचे सरकार स्थापन केले आणि 2019 मध्येही आमचे सरकार आले. कारण लोकांचे संकल्प प्रत्यक्षात आणण्याची क्षमता कोणामध्ये आहे हे देशाला कळून चुकले आहे. म्हणूनच 2019 मध्ये मला पुन्हा एकदा देशसेवेची संधी मिळाली. भारतातील तरुणांच्या स्वप्नांना आणि महत्त्वाकांक्षांना संधी देण्याची या सभागृहात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. सरकारमध्ये असताना आम्हीही ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. भारतातील तरुणांना आम्ही घोटाळेमुक्त सरकार दिले. जगात भारताची कलंकित झालेली प्रतिष्ठा आम्ही हाताळली आहे आणि पुन्हा एकदा नव्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. तरीही काही लोक देशाच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत, हे जगाला कळून चुकले असल्याचे मोदी म्हणाले.
हेही वाचा – विरोधकांकडे सिक्रेट वरदान आहे, ते ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचे भले होते; मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
देशातील गरिबी झपाट्याने कमी होत आहे
आमच्या विरोधी सहकाऱ्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करताना मोदी म्हणाले की, विरोधकांनी अविश्वास ठरावाच्या नावाखाली जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज भारतातील तरुण विक्रमी संख्येने स्टार्टअप्स उघडून आपल्याला आश्चर्यचकित करत आहेत. विक्रमी विदेशी गुंतवणूक येत आहे. निर्यातीने नवीन उंची गाठली आहे. आज ते भारताबद्दल चांगल्या गोष्टी ऐकू शकत नाहीत. आज त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा विश्वास गरिबांच्या हृदयात निर्माण झाला आहे. आज देशातील गरिबी झपाट्याने कमी होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, अशी माहितीही मोदींनी दिली.