छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, नवी दिल्ली – तब्बल सात दशकांनी देशाच्या राजधानीत दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. यावळी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवळकर उपस्थित होत्या. साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा हात पकडून दीपप्रज्वलन केले. तसेच शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना खुर्चीवर बसण्यासाठी त्यांचा हात पकडून त्यांना मदत केली. शरद पवार त्यांच्या आसनावर स्थानापन्न झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शरद पवार यांच्यातील जवळीक दिसून आली.

दिल्ली महाराष्ट्राचे एक नाते, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध – शरद पवार
संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले, दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीमध्ये होणारं हे दुसरं मराठी साहित्य संमेलन आहे. याआधी झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी केले, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्याचा किस्साही सांगितला. ते म्हणाले, मराठी साहित्याचा अमृत अनुभव घेण्यासाठी आपण आज पुन्हा एकदा जमलो, त्याचा मला मनापासून अभिमान आहे. हे संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले, याचा मला मनापासून आनंद आहे. महाराष्ट्र शासन, साहित्यिक आणि रसिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरवठा केला. या दर्जा मिळवण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतं आहे. मी निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी होकार देण्यासाठी एक मिनीटही घेतला नाही.

शमिमा अख्तर यांच्या सूरमधुर आवाजात गर्जा महाराष्ट्र गीताचे बोल ऐकताच सभागृह रोमांचित झाले. शमिमा यांच्या पहाडी व सुरेल आवाजाने दिल्लीकरांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मंत्रमुग्ध झाले. शमिमा यांना यावेळी, स्वरसाथ सिद्दिकी यांनी दिली.
हेही वाचा : Chhaava : मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांकडून छावाचा उल्लेख, उपस्थितांनी दिल्या घोषणा