पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६ वाजता देशाला करणार संबोधित; ट्वीट करून दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले की, “मी आज संध्याकाळी ६ वाजता देशाला संदेश देणार आहे. तुम्ही नक्की देखील सहभागी व्हा” दरम्यान ते कोणत्या मुद्दय़ावर नागरिकांशी संवाद साधणार आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी कोणतीच माहिती दिली नाही, पण पंतप्रधान मोदी देशातील सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाव्हायरस साथीच्या परिस्थितीची दखल घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या ७६ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे.

 

सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे. पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण आहे. सणांचे हे दिवस देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. लॉकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण अजूनही अर्थव्यवस्थेची गाडी पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सणवाराच्या या काळात मोठी उलाढाल अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काय घोषणा करणार? नवीन पॅकेज जाहीर करणार का? कर्जदारांना दिलासा मिळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या मोदींच्या संबोधनात अपेक्षित आहेत.

दरम्यान, देशात कोरोना विषाणूचे संकट कायम आहे, पंतप्रधानांनी लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर आज सण-उत्सावाच्या या कळात कोरोनाचा फैलावही वेगाने होण्याची भीती आहे. त्यामुळे मोदी त्या दृष्टीने काय बोलणार? याकडे साऱ्या जनतेचे लक्ष आहे.

तर देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाख ९७ हजार ०६४ इतका झाला असून एका दिवसांत ४६ हजार ७९१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ५८७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. सध्या देशामध्ये ७ लाख ४८ हजार ५३८ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत ६७ लाख ३३ हजार ३२९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ लाख १५ हजार १९७ जणांचा बळी या कोरोनामुळे गेला आहे.


बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री योगी यांची एन्ट्री; आजपासून प्रचार सुरू