PM-KISAN 11th installment: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, लवकरच जमा होणार पीएम किसानचा ११ वा हप्ता

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांचा ११ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २१ हजार कोटींचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ३१ मे रोजी शिमला, हिमाचल येथे पीएम-किसान योजनेअंतर्गत १० कोटी शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक लाभाचा ११ वा हप्ता जारी करणार आहेत.

‘गरीब कल्याण संमेलन’ या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पंतप्रधान मोदी ९ केंद्रीय मंत्रालयांद्वारे लागू केलेल्या १६ योजना आणि कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असल्याचे कृषी मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. वर्षभर चालणाऱ्या उत्सवांचा एक भाग म्हणून ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २१ हजार कोटी रुपयांच्या किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्ता पंतप्रधान जारी करतील, असे निवेदनात म्हटले आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर दिल्लीच्या पुसा कॅम्पसमधून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : PM Kisan निधी योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

पात्र असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना वर्षाला ६ हजारांचा आर्थिक लाभ मिळतो. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. १ जानेवारीला पंतप्रधानांनी १० कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना २० हजार कोटींहून अधिक रुपयांचा १० वा हप्ता जारी केला होता.

या योजनांचा आहे समावेश

केंद्रीय योजनांमध्ये पीएम-किसान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी), जल जीवन मिशन आणि AMRUT यांचा समावेश आहे. यामध्ये प्रधानमंत्री स्वानिधी योजना, वन नेशन-वन रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत, पीएम जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यांचा समावेश आहे.


हेही वाचा : Rajya Sabha Elections 2022: शायद मेरी तपस्या में कुछ..,राज्यसभेची उमेदवारी डावलताच काँग्रेस नेत्यानं ट्विट करत व्यक्त केली नाराजी