Good News : मोदी सरकारचा मोठा दिलासा! पेट्रोल ९.५० पैसे, डिझेल लीटरमागे ७ रु. होणार स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) वाढत्या दराबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठा निर्णय घेतला असून केंद्रीय अबकारी कर कमी केला आहे. यामुळे देशात वाढणारी महागाई (Inflation) कमी होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Price of petrol and diesel)  मोठी कपात केली असून पेट्रोल लीटरमागे ९.५० पैशांनी स्वस्त तर डिझेल प्रतिलीटर ७ रु. स्वस्त होणार आहे. अबकारीवरील कपातीचा पेट्रोल-डिझेल असोसिएशनने स्वागत केले असून ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांमध्ये क्रूड ऑईलच्या (Crude Oil) किंमती झपाट्याने खाली येत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र कमी होत नव्हते. तसेच घरगुती सिलेंडर (Gas Cylinder) आणि सीएनजीच्या (CNG) किंमती गगनाला भिडल्या होत्या. घरगुती सिलेंडरच्या वाढणाऱ्या दरांबद्दल मध्यमवर्गीय आणि गृहिणी नाराज होत्या. अखेर मोदी सरकारने देशवासियांना मोठा दिलासा देत वर्षाला मिळणाऱ्या बारा सिलेंडर मागे दोनशे रूपयांची सबसीडी देण्याचाही निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया…

मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यानंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. झुकती है सरकार, झुकाने वाला चाहिए आख़िरकार असं ट्विट चतुर्वेदी यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ८ रुपये आणि ६ रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे. गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.

आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत मोदींनी मोठा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. गेल्या ७ महिन्यांमध्ये सौदी सीपीमध्ये ४३ टक्के पर्यंती वाढ असूनही आपल्या एलपीजीच्या किंमती केवळ ११ टक्क्यांनी वाढल्या आहेत, असं हरदीप सिंह पुरी म्हणाले.

मुख्यमंत्री पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार का?, नवनीत राणांचा सवाल

केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केली असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभरात लवकरच कमी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार का? उद्धव ठाकरेंना माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी हे कधी समजणार?, असे अनेक सवाल नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर पलटवार

आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करुन दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यास खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर पलटवार केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं ट्विट…

जागतिक बाजारपेठेत खतं महाग होत असली, तरी केंद्रानं या भाववाढीपासून शेतकऱ्यांना संरक्षण दिलंय. अर्थसंकल्पातील 1.05 लाख कोटींच्या अनुदानात 1.10 लाख कोटींची भर टाकून भाववाढीचे चटके शेतकऱ्यांना बसणार नाहीत, याची काळजी केंद्रानं घेतली आहे, असं ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

सिमेंटची उपलब्धता वाढावी आणि अधिक चांगल्या प्रकारे वाहतुकीतून सिमेंटची किंमतही कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सिमेंट स्वस्त झाल्याने पायाभूत क्षेत्रांचा विकास होण्यासही चालना मिळू शकेल.

मोठ्या प्रमाणावर आयात होते असा प्लास्टिकचा कच्चा माल आणि अन्य घटकांवरील सीमाशुल्कात केंद्र सरकारनं कपात केली आहे. पोलादासाठी लागणाऱ्या काही कच्च्या मालावरील सीमाशुल्कातही कपात होईल. तर काही पोलादी उत्पादनांच्या निर्यातीवर कर लावला जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

घरगुती सिलेंडरच्या दरात २०० रुपयांची घट

१२ सिलेंडरपर्यंत २०० रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ९ कोटी उज्वला योजना धारकांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, केंद्राला दरवर्षी जवळपास सहा हजार कोटी रूपयांचा फटका बसणार आहे.

अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादनांवरील अबकारी, कस्टम, आयात आणि निर्यात शुल्क कमी करण्याबाबत माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हापासून पदभार स्वीकारला, तेव्हापासून केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी अनेक पावले उचलली आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) म्हणाल्या.


हेही वाचा : Maharashtra Petrol-Diesel Price : मुंबई ते नाशिकपर्यंत राज्यातील प्रमुख शहरात पेट्रोल डिझेल महागले, जाणून घ्या आजचे दर