नवी दिल्ली : संविधानाच्या 75 वर्षांच्या निमित्ताने लोकसभेत दोन दिवसांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी संविधानाचे महत्त्व सांगत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या काँग्रेसच्या काळातील पंतप्रधानांवर सडकून टीका केली. काँग्रेसच्या काळात कायमच एका कुटुंबाने संविधानाचा गळा घोटण्याचे काम केले आणि त्याची वारंवार हत्या केली, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. तसेच, काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेत 75 वेळा संविधान बदलण्यात आल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी या भाषणाच्या माध्यमातून केला आहे. (PM Narendra Modi will attack the Congress through the discussion of the Constitution)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला संविधान सभेतील तीन महत्त्वाच्या सदस्यांची विधान वाचून दाखवली. यामध्ये त्यांनी पहिल्यांदा राजश्री पुरुषोत्तमदास टंडन यांचे विधान वाचून दाखवले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजश्री पुरुषोत्तमदास टंडन म्हणाले होते की, शतकानंतर आमच्या देशात एकदा पुन्हा अशी बैठक बोलावली गेली आहे की आम्हाला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण येते. जेव्हा आम्ही स्वतंत्र होतो तेव्हा सभा आयोजित केल्या जायच्या. ज्यात विद्वान लोक देशातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यास येत असे. तर, दुसरं वाक्य संविधान सभेचे सदस्य डॉ. राधाकृष्णन यांचे वाचून दाखवत म्हटले की, या महान राष्ट्रासाठी गणतांत्रिक व्यवस्था नवीन नाही. आमच्या येथे हे इतिहासाच्या सुरुवातीपासूनच आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले विधान वाचवून दाखवत म्हटले की, भारताला लोकशाही व्यवस्था माहीत नव्हती, असे नाही. तर भारतात पूर्वीपासून अनेक गणतंत्र व्यवस्था होती, असे आंबेडकरांनी म्हटल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
काँग्रेसवर मोदींचा हल्लाबोल…
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत म्हटले की, काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाला इजा पोहोचवण्यास कोणतीही कसर सोडली नाही. 55 वर्षे एकाच कुटुंबाने राज्य केले. त्यामुळे देशात काय काय झाले हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुरिती, कुनीती याची परंपरा निरंतर सुरू आहे. प्रत्येक स्तरावर या परिवाराने संविधानाला आव्हान दिले आहे, अशी टीका मोदींनी केली. 1947 ते 1952 या देशात इलेक्टेड सरकार नव्हते. एक सिलेक्टेड सरकार होते. निवडणुका झाल्या नव्हत्या. अंतरिम व्यवस्थेच्या रुपाने सरकार स्थापन झाले होते. 1952 च्या पूर्वी राज्यसभेचेही गठण झाले नव्हते. जनतेचा कोणताही आदेश नव्हता. त्याच काळात संविधान मंथन करून संविधान तयार झाले होते. 1952 मध्ये सरकार तयार झाले, तेव्हा त्यांनी ऑर्डियन्स करून संविधान बदलले. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला. हा संविधान निर्मात्यांचाही अपमान होता. त्यांना जशी संधी मिळाली त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हातोडा मारला. हा संविधान निर्मात्यांचा घोर अपमान आहे. आपल्या मनाप्रमाणे संविधान सभेत करू शकले नाहीत ते त्यांनी मागच्या दाराने केलं. ते निवडून आलेल्या सरकारचे पंतप्रधान नसतानाही त्यांनी हे पाप केले, असा आरोप यावेळी पंतप्रधान मोदींनी केला.
तसेच, त्याच काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. जर संविधान आपल्या मार्गात येत असेल तर कोणत्याही परिस्थिती संविधानात परिवर्तन केले गेले पाहिजे, अशा आशयाचे पत्र तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, असे यावेळी मोदींकडून सांगण्यात आले. 1951 मध्ये हे पाप केले गेले. पण देश शांत नव्हता. त्यावळी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इशारा दिला होता. पंडितजींना सांगितले की चुकीचे होत आहे. आचार्य कृपलानी, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या महान काँग्रेस लोकांनीही पंडित नेहरूंना थांबण्यासाठी सांगितले. पण त्यांचे स्वतंत्र संविधान चालत होते. त्यांनी या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला ऐकला नाही, असा आरोपही यावेळी संविधान चर्चेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.