PNB Scam: मेहुल चोक्सीला ED चा दणका; कोट्यावधींच्या मालमत्तेवर टाच

पंजाब नॅशनल बंक घोटाळ्याप्रकरणातील मुख्य फरार आरोपी मेहूल चोक्सीला ED ने दणका दिला आहे. ईडीने PNB घोटाळ्यातील गीतांजली ग्रुप आणि या ग्रुपचा मालक मेहुल चोक्सीची १४ कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. या मालमत्तांमध्ये गोरेगाव येथील आलिशान फ्लॅट, मौल्यवान वस्तू आणि मर्सिडीज कार यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा देशातील एक मोठा बँक घोटाळा आहे. १३ हजार कोटींहून अधिकचा हा घोटाळा आहे.

पंजाब नॅशनल बंक घोटाळ्याप्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी विरोधातील कारवाईबाबतचं एक पत्रक ईडीने प्रसिद्ध केलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये मुंबईतील गोरेगाव परिसरातील ओ२ टॉवरमधील १४६० चौकिमीचा फ्लॅट, सोने आणि प्लॅटिनमचे दागिने, हीरे, चांदी आणि मोत्यांचे नेकलेस, घड्याळे आणि एका मर्सिडिझ बेंझ गाडीचा समावेश आहे. PNB गैरव्यवहारात मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली ग्रुपशी संबंधित कंपन्यांसह अतर कंपन्यांमधील अधिकारी गुंतले आहेत. सीबीआयने या सर्वांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध, कट कारस्थान, फसवणूक आदी कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत.