घरदेश-विदेशकेंद्रीय मंत्र्यांच्या हत्येचा कट पोलिसांनी लावला उधळून

केंद्रीय मंत्र्यांच्या हत्येचा कट पोलिसांनी लावला उधळून

Subscribe

केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या हत्येचा मोठा कट हाजीपूर पोलिसांनी हाणून पाडला आहे. महाशिवरात्रीनिमित्त हाजीपूर येथे होणाऱ्या मिरवणुकीत केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्यावर हल्ला करण्याची तयारी करण्यात आली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हत्येचा मोठा कट हाजीपूर पोलिसांकडून हाणून पाडण्यात आला आहे. नित्यानंद राय यांच्या हल्ल्याचा कट रचत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीनिमित्त हाजीपूर येथील बाबा पाताळेश्वर नाथ मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेत केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू होती.

दरवर्षी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय स्वतः हाजीपूरच्या बाबा पाताळेश्वर नाथ मंदिरातून निघणाऱ्या शिवबारात यात्रेत सहभागी होतात. बाबा भोलेनाथला बैलगाडीवर बसवून स्वतः नित्यानंद या बैलगाडीचे चालक बनतात. या मिरवणुकीमध्ये लाखोंचा जमाव जमतो. तसेच या यात्रेमध्ये भाविक सुमारे पाच किलोमीटरचे अंतर पार करतात. यावेळी नित्यानंद राय यांचा शिव यात्रेत सहभागी होण्याचे निश्चित होते. त्यामुळे याचवेळी हल्लेखोरांकडून नित्यानंद राय यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता.

- Advertisement -

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अटक करण्यात आलेला तरुण मिरवणुकीत केंद्रीय मंत्री नित्यानंद यांना गोळ्या घालून ठार मारण्याबाबत बोलताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही तरुण बसून आपापसात बोलत असल्याचे सुद्धा दिसत आहे. तेव्हाच एक तरुण नित्यानंदची सुपारी घेतल्याचे सांगतो. तो म्हणतो की, तीन वर्षांपासून शिवरात्रीच्या आधी त्याला स्वप्न पडते की त्याने नित्यानंद रायला मारले आहे. तो बैलाकडे जात आहे आणि मी त्याच्यावर गोळीबार करत आहे.

हेही वाचा – केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला माहिती पुरवतात, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

- Advertisement -

यासंदर्भात वैशाली पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढले. ज्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, पोलिसांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ मिळाला. यामध्ये एक तरुण केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना उद्देशून असभ्य आणि आक्षेपार्ह टिप्पणी करत आहे. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याची चर्चा करत असल्याचे बोलत आहे. माधवकुमार झा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, वैशाली पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी एका विशेष पथकाची नेमणूक केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -