Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग पोलिसांना हवी तशी दाढी, केस ठेवता येणार नाही; मिशीची मात्र परवानगी!

पोलिसांना हवी तशी दाढी, केस ठेवता येणार नाही; मिशीची मात्र परवानगी!

Related Story

- Advertisement -

पोलीस विभाग म्हणजे अनुशासन आणि शिस्त असं मानलं जातं. मग त्यांच्या गणवेशापासून त्यांच्या वागणुकीमध्ये देखील हीच शिस्त आणि अनुशासन दिसत असतं. मात्र, अनेकदा काही पोलीस अस्ताव्यस्त गणवेश किंवा दाढी-केसांची योग्य रचना नसलेले आढळलेले आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये डीजीपींनी थेट आदेश जारी केला आहे. पोलिसांना योग्य परवानगीशिवाय दाढी आणि केस मोठे किंवा हवे तसे ठेवता येणार नाहीत, असं या आदेशांमध्ये म्हटलं आहे. मध्यंतरीच्या काळात उत्तर प्रदेशच्या बागपत या ठिकाणी असलेल्या सब इन्स्पेक्टर अर्थात पोलीस उपनिरीक्षकाच्या दाढीवरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर यासंदर्भातले आदेश डीजीपींना जारी करावे लागले. त्यासोबतच पोलिसांची वर्दी आणि पायातले जोडे याबाबत देखील या आदेशांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

बागपतला काय झालं होतं?

बागपतच्या पोलीस उपनिरीक्षकांनी मोठी दाढी वाढवली होती. मात्र, परवानगी नसताना देखील दाढी वाढवली म्हणून वरिष्ठांनी त्यांना दाढी काढायला सांगितली. पण आपण दाढी काढणार नाही अशी ठाम भूमिकाच या उपनिरीक्षकांनी घेतली. त्यामुळे अखेर डीजीपींनी आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार धार्मिक आधारावर अनिश्चित कालावधीसाठी दाढी वाढवण्यासाठी किंवा केस मोठे ठेवण्यासाठी विभागाकडून योग्य त्या कारणांखाली परवानगी दिली जाऊ शकते. पण स्टायलिश दाढी ठेवायची परवानगी नसेल. मिशा मात्र पोलीस त्यांच्या इच्छेनुसार ठेऊ शकतील. पण मिशा व्यवस्थित ट्रीम केलेल्या असाव्यात, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

तसेच, पोलिसांनी ठरवून दिलेला गणवेशच घालणं आवश्यक आहे. त्यासोबत पायात कुठलेही बूट, चप्पल न घालता विभागाकडून निश्चित करण्यात आलेले बूटच घालावे लागतील, असं देखील या आदेशांमध्ये नमूद केलं आहे.

- Advertisement -