राजकीय देणग्या देण्यात ‘या’ कंपन्या आघाडीवर; भारती ग्रुप आणि आयटीसी टॉप 3 मध्ये

political donations to parties bjp congress assciation for democritice reforms report
राजकीय देणग्या देण्यात 'या' कंपन्या आघाडीवर; भारती ग्रुप आणि आयटीसी टॉप 3 मध्ये

कॉर्पोरेट जगताकडून राजकीय पक्षांना दरवर्षी करोडोंच्या देणग्या मिळत असतात. अनेक नामंकित कंपन्या विविध पक्षांना या राजकीय देणग्या देत असतात. मात्र या देणग्या देणाऱ्यांमध्ये कॉर्पोरेट्समधील काही अज्ञात नावांचाही समावेश आहे. दरम्यान राजकारणात पारदर्शकतेसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने नुकत्याच दिलेल्या अहवालात राजकीय निधी देणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारती ग्रुप (भारती एंटरप्रायझेस) आणि ITC सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

भारती ग्रुप पक्षांना देणग्या देण्यात अग्रेसर

आडीआर अहवालानुसार, भारती एंटरप्रायझेसद्वारे समर्थित प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट देणग्यांमध्ये आघाडीवर आहे. 2019-20 मध्ये राजकीय पक्षांना 247.75 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. 2016-17 आणि 2017-18 मध्येही देणग्या देण्यात ही ट्रस्ट आघाडीवर होती. या दोन वर्षांत ट्रस्टने केवळ भाजप आणि काँग्रेस (INC) यांना 429.42 कोटी रुपयांची देणगी दिली होती. तेव्हा या कंपनीला सत्य इलेक्टोरल ट्रस्ट म्हणून ओळखले जात होते. 2019-20 मध्येही या ट्रस्टने प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसला देणगी दिली आहे. यादरम्यान प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टकडून भाजपला 216.75 कोटी रुपये आणि काँग्रेसला 31 कोटी रुपये मिळाले.

‘या’ कंपन्यांनी दिली सर्वाधिक राजकीय देणगी

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देणगीच्या बाबतीत टॉप कॉर्पोरेट्समध्ये ITC लिमिटेड, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट, बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील कॉर्पोरेट पार्क प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात जरी भारती एंटरप्रायझेस द्वारे समर्थित प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट देणग्या देण्यात आघाडीवर होते. परंतु त्यापूर्वी म्हणजे 2018-19 या आर्थिक वर्षात ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर टाटा सपोर्टेड प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टने सर्वाधिक देणग्या दिल्या आहेत.

एकट्या भाजपला मिळाली 78 टक्के राजकीय देणगी

कोणत्याही पक्षाला 20 हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी दिल्यास देणगीदाराला नाव, पत्ता आणि पॅन क्रमांकाची माहिती द्यावी लागेल. निनावी राहूनही यापेक्षा कमी देणगी देता येते. नंतर पक्ष निवडणूक आयोगाला किती देणगी मिळाली हे सांगतात. एडीआरच्या अहवालानुसार, केंद्रात सरकार चालवत असलेला भारतीय जनता पक्ष देणग्या मिळवण्यात आघाडीवर आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात टॉप-5 पक्षांना मिळून 921.95 कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट देणग्या मिळाल्या आणि त्यापैकी 720.40 कोटी रुपये एकट्या भाजपला मिळाले.

भाजप व्यतिरिक्त देणग्या मिळवणाऱ्या पक्षांच्या नावांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPM) आणि तृणमूल काँग्रेस (AITC) यांचा समावेश आहे. यावेळी सीपीआयला कोणतीही देणगी मिळालेली नाही. काँग्रेसला 133.04 कोटी आणि राष्ट्रवादीला 57.08 कोटी रुपये मिळाले आहेत. CPI(M) ला मुथूट फायनान्सकडून 2.65 कोटी रुपये, कल्याण ज्वेलर्सकडून 1.12 कोटी रुपये आणि नवयुग इंजिनिअरिंगकडून 0.5 कोटी रुपये मिळाले आहेत. तृणमूल काँग्रेसला न्यू डेमोक्रॅटिक इलेक्टोरल ट्रस्ट, टेक्समॅको इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग लिमिटेड आणि टेक्समॅको रेल आणि इंजिनिअरिंग लिमिटेड यांच्याकडून देणग्या मिळाल्या आहेत.


तुम्ही तुमची कबर खोदण्यासाठी सुरुवात केली, संजय राऊतांचा भाजपला इशारा