नवी दिल्ली : कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. 88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या आठवड्यापासून रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. यामुळे सध्या व्हॅटिकनमधील परिस्थिती गांभीर्याने घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनच्या म्हणण्यानुसार, पोप यांनी स्वतः सांगितले आहे की, न्यूमोनियापासून वाचण्याची कोणतीही आशा नाही. तर दुसरीकडे, स्विस वृत्तपत्र ब्लिकने हा दावा केला आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर स्विस गार्डच्या प्रवक्त्याने याला अफवा ठरवत ते त्यांच्या नेहमीच्या नित्यक्रमानुसार काम करत असल्याचे सांगितले. (Pope Francis health update pneumonia and Lung infection news in Marathi)
गुरुवारी (ता. 20 फेब्रुवारी) ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती स्थिर असल्याचे व्हॅटिकनकडून सांगण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असल्याचेही सांगण्यात आले. पण सीएनएनने व्हॅटिकनच्या एका स्रोताचा हवाला देत म्हटले की, पोप आपल्या पलंगावरून उठून हॉस्पिटलच्या खोलीत खुर्चीवर बसू शकले. यापूर्वी सोमवारी व्हॅटिकनने सांगितले होते की, पोप फ्रान्सिस यांना श्वसनमार्गामध्ये पॉलिमायक्रोबियल इन्फेक्शन आहे, त्यामुळे त्यांचे वैद्यकीय उपचार बदलावे लागले. यानंतर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया असूनही पोप फ्रान्सिस यांचा मूड चांगला आहे. तर बुधवारी पोप यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत पोप फ्रान्सिस यांना त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांशिवाय कोणीही भेटायला आले नाही.
हेही वाचा… SC : हुंडा मागितला नाही तरी 498 A अंतर्गत खटला चालेल; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
तर, पोप फ्रान्सिस यांची भेट घेण्याकरिता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी गेल्या होत्या. पोप यांना सोमवारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान मेलोनी यांनी बुधवारी त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये साधारणतः 20 मिनिटे भेट झाली. या भेटीनंतर पंतप्रधान मेलोनी यांनी प्रसार माध्यमांसमोर येत माहिती दिली की, पोप यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तसेच, ‘पोप आणि मी नेहमीप्रमाणे विनोद केला. पोप यांनी आपली विनोदबुद्धी गमावलेली नाही, असेही यावेळी मेलोनी यांच्याकडून सांगण्यात आले. पोप यांना भेटणाऱ्या मेलोनी या पहिल्या नेत्या आहेत.