महाराष्ट्रात राजकीय वादळ अन् आसाममध्ये पोस्टरवॉर!

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने महाविकास आघाडी सरकारला हादरा बसला आहे. या बंडखोरांविरोधातल शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. एकूणच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच आसाममध्ये यावरूनच पोस्टरवॉर रंगले आहे.

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी फडकावलेल्या बंडाच्या झेंड्याखाली महाविकास आघाडीतील जवळपास 50 आमदार जमा झाले आहेत. हे सर्व सध्या आसामच्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलजवळ एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकले आहे. या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो असून ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ आणि ‘शिंदे साहब हम आपके साथ हैं’ असे लिहिले आहे.

तर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गुवाहाटीत ठिकठिकाणी पोस्टर लावून या बंडखोरांना ‘गद्दार’ म्हटले आहे. ‘सारा देश देख रहा है, गुवाहाटी में छुपे गद्दारोंको, माफ नहीं करेगी जनता, ऐसे फर्जी मक्कारों को’ असे या पोस्टरवर लिहिले आहे.