Power Crisis in India: कोळशाच्या टंचाईमुळे देश अंधारात जाण्याची भीती! वाचा देशातील नेमकी स्थिती

Power Crisis in India deepens delhi panjab bihar due to shortage of coal know its effect on your state
Power Crisis in India: कोळशाच्या टंचाईमुळे देश अंधारात जाण्याची भीती! पाहा नेमकी देशातील स्थिती

कोळशाच्या टंचाईमुळे देशावरील वीज संकटाचा धोका वाढला आहे. गेल्या महिन्यात देशातील अनेक राज्यांत सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोळसा खाणीतील उत्खनन बंद होते. यामुळे कोळाशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अनेक राज्यांतील वीज प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दिल्लीत फक्त एक दिवस पुरेल इतका कोळश्याचा साठा शिल्लक आहे आणि पंजाबच्या औष्णिक प्रकल्पांमध्ये फक्त दोन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. यामुळे शनिवारी मागणीच्या केवळ अर्ध्या विजेची गरज पूर्ण होऊ शकली. त्यामुळे सहा तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही सहा तास वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. तर झारखंडच्या ग्रामीण भागात आठ ते दहा तासांची वीज कपात सुरु आहे. यामुळे गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडूसह इतर अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पांवर परिणाम झाला आहे.

राजधानी दिल्लीत चिंताजनक परिस्थिती

सर्वात चिंताजनक परिस्थिती राजधानी दिल्लीत निर्माण झाली आहे. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीने समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. या पत्रात त्यांनी वीज ज्या ठिकाणाहून दिल्लीला वीज पुरवठा होतो त्या प्रकल्पांमधील कोळशाच्या उपलब्धतेविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, नियमानुसार, या प्रकल्पांकडे सुमारे २० दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा असायला हवा होता, पण हा साठा एका दिवसावर आला आहे. यामुळे गॅसवर आधारित वीजनिर्मिती केंद्रांवरील भार वाढला आहे. परंतु त्यांच्याकडे पुरेसा गॅसचा साठाही शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकरणात आता पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्यूशन लिमिटेड (टीपीडीडीएल) ने संभाव्य वीज कपातीबाबत ग्राहकांनाही सतर्क मेसेज पाठवला आहे.

पंजाबमध्येही परिस्थिती गंभीर

दिल्लीप्रमाणे हरियाणामध्ये विजेचे कोणतेही संकट नाही, पण पंजाबमधील परिस्थिती गंभीर होत आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (पॉवरकॉम) वीजेची कमतरता पूर्ण करण्यासाठी इतर कंपन्यांकडून वीज खरेदी केली, पण तरीही दोन ते सहा तास वीज खंडित करावी लागली. या वीज कपातीमुळे कंपनीकडे एकाच दिवसात २७ हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या, तर शुक्रवारी २४ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. यावर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी आढावा बैठक घेतला. यात त्यांनी कोळसा पुरवठा न करणाऱ्या कंपन्यांना नोटीस देत सांगितले की, कोळशाचे साठे झपाट्याने कमी होत असल्याने पॉवरकॉमचे औष्णिक प्रकल्प बंद झाले आहेत. त्यामुळे कंपन्यांनी त्वरित कोळशाचा पुरवठा वाढवावा.

जम्मू -काश्मीरमध्ये अघोषित वीज कपात

जम्मू -काश्मीरमध्येही पाच ते सहा तासांची अघोषित वीज कपात सुरु आहे. एका जिल्ह्यात एक तास वीज कपात केल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात एक तास वीज कपात केली जातेय. अशाप्रकारे कर विभागाकडून एका दिवसात एकूण पाच ते सहा तासांची वीज कपात केली जात आहे. सध्या जम्मू -काश्मीरला औष्णिक प्रल्कपांपासून ३०० ते ४०० मेगावॅट वीज मिळते. हिवाळ्यात जेव्हा नद्यांमधील पाणी पातळी कमी होते तेव्हा जम्मू आणि काश्मीरचा ४० टक्के पुरवठा औष्णिक प्रकल्पांवर अवलंबून असतो. एकूणच महाराष्ट्रावर ही वीज कपातीचे टांगती तलवार आहे.

झारखंड, गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्लीस बिहार, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मिती कमी झाली आहे. फक्त काही दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असल्याची माहिती देऊन वीज उत्पादक आणि वितरकांनी वीज कपातीचा इशारा दिला आहे. मात्र कोळसा मंत्रालयाचे म्हणणे आहे की, देशात पुरेसा कोळसा आहे आणि माल सतत भरला जात आहे.