प्रफुल्ल पटेलांनी लेकाच्या लग्नात ‘जुम्मे की रात’ गाण्यावर सलमानसोबत धरला ठेका

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय पटेलच्या लग्नानिमित्त जयपूरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला बड्या उद्योगपतींसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. भारताचे सर्वोत्कृष्ट उद्योगपती अनिल अंबानी, गौतम अदानी यांच्यासह इतर उद्योगपती आणि नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. लग्नानिमित्त हा कार्यक्रम सोहळा जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, विशेष म्हणजे या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल यांनी ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत ठेका धरला आहे.

प्रफुल्ल पटेलांच्या लेकाच्या लग्नाचं जयपूरमध्ये जंगी सेलिब्रेशन सुरू आहे. मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रेटी सलमान खान, शिल्पा शेट्टी आणि अनिल कपूर यांच्यासह पटेल डान्स करतांना दिसले. प्रजय पटेलचं लग्न मुंबईतील ज्वेलरी व्यावसायिक शिरीष पुंगिलिया यांची मुलगी शिविका हिच्यासोबत झालं आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी , सज्जन जिंदल, भारती एअरटेलचे सुनील भारती, हिंदुजा समुहाचे श्रीचंद हिंदुजा देखील उपस्थित होते. १८ डिसेंबरच्या सायंकाळ पर्यंत ३५ विमानांचं जयपूरमध्ये आगमन झालं होतं. तसेच महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि क्रिकेटर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये शिवसेनेचे खासदास संजय राऊत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अनिल अग्रवाल आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.

जयपूरच्या विमानतळावर चोख बंदोबस्त करण्यात आला होता. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा,जया बच्चन, प्रफुल्ल पटेल यांचे बंधू अमरिश पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, डॉ. केतन देसाई, भाजप नेते राजीव प्रताप रुडी देखील समारंभात सहभागी झाले होते.

दरम्यान, देशात कोरोना विषाणूचे संकट अद्यापही कमी झालेले नाहीये. तसेच कोविड-१९ चा नवीन विषाणू ओमिक्रॉन व्हेरियंटने आता हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. त्याचसोबतच समारंभ आणि इतर कार्यक्रमांवर काही नियम व अटी लादण्यात आल्या आहेत. तरीदेखील बड्या नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. दुसरीकडे पाहीलं असता सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उठवताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम हे फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?,असा प्रश्न देखील येथे उपस्थित होत आहे.


हेही वाचा : आनंद महिंद्रांनी केलं राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचं कौतुक, व्हिडिओ शेअर करत दिली भन्नाट ऑफर