भारतीय वंशाच्या प्रमिला जयपाल यांची अमेरिकेत इमिग्रेशनसंदर्भातील पॅनलवर नियुक्ती

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या नागरिकाने पुन्हा एकदा अमेरिकेत देशाचा झेंडा फडकावला आहे. भारतीय वंशाच्या प्रमिला जयपाल (Indian-American Congresswoman Pramila Jayapal) यांना महत्त्वाच्या हाऊस ज्युडिशिअरी कमिटीच्या (House Judiciary Committee) इमिग्रेशनसंदर्भातील पॅनेलमध्ये रँकिंग सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. उपसमितीचे नेतृत्व करणारी ती पहिली स्थलांतरीत व्यक्ती ठरली आहे.

प्रमिला जयपाल या वॉशिंग्टनच्या 7व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधित्व करतात. इमिग्रेशन इंटिग्रिटी, सिक्युरिटी अँड एनफोर्समेंट या उपसमितीच्या महिला सदस्य जो लोफग्रेन यांची जागी 57 वर्षीय प्रमिला जयपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून आलेली पहिली दक्षिण आशियाई महिला असून हाऊस ज्युडिशिअरी कमिटीच्या इमिग्रेशनसंदर्भातील पॅनेलमध्ये रँकिंग सदस्य म्हणून सेवा करण्याचा मला सन्मान मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया प्रमिला जयपाल यांनी रँकिंग सदस्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर दिली.

मी 16 वर्षांची असताना एकटीच अमेरिकेत आले होते. मात्र, अमेरिकन नागरिक होण्यासाठी मला 17 वर्षे वाट पाहावी लागली. हे स्वप्न अजूनही अनेक स्थलांतरीतांच्या अवाक्याबाहेर आहे, असे सांगून प्रमिला जयपाल म्हणाल्या, अशा स्थितीत सन्मान, माणुसकी आणि न्याय या भूमिकेतून इमिग्रेशन प्रणाली पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेत मी आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

प्रमिला अमेरिकन काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी बराच काळापासून स्थलांतरितांसाठी लढत आहेत. त्याने वॉशिंग्टनमधील सर्वात मोठी स्थलांतरित संघटना, ‘वन अमेरिका’ सुरू केली होती. 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी ही संघटना स्थापन केली. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चेंज हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे.

रिपब्लिकनवर निशाणा
इमिग्रेशन प्रणाली खंडित राहावी अशी इच्छा असल्याने रिपब्लिकन इमिग्रेशन रिफॉर्म मंजूर करण्यास नकार देतात. त्यांनी स्थलांतरितांचा राजकीयदृष्ट्या फुटबॉल म्हणून वापर करणे थांबवण्याची तसेच लोकांना आमच्या देशात स्थलांतरित होण्यासाठी सुकर मार्ग तयार करण्यासाठी आमच्यासोबत काम करण्याची वेळ आली आहे, असे जयपाल यांनी म्हटले आहे.