राजस्थान : काँग्रेसचे माजी मंत्री आणि राजस्थानातील उदयपुरवाटी विधानसभेचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज (ता. 09 सप्टेंबर) शिवसेनेत प्रवेश केला. राजस्थानमधील झुनझुनूमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे विशेष हेलिकॉप्टरने राजस्थानात दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून आमदार राजेंद्रसिंह गुढा हे बरेच चर्चेमध्ये होते. ते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जायचे. पण मागील महिन्यात लाल डायरीच्या मुद्द्यावरून त्यांची राजस्थानच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. ज्यानंतर त्यांनी आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (presence of CM Eknath Shinde, former minister of Congress joined Shiv Sena in Rajasthan)
हेही वाचा – G20India2023 : G-20मध्ये ‘भारता’ ने वेधले सर्वांचे लक्ष, आफ्रिकन युनियनला मिळाले कायम सदस्यत्व
यावेळी या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राजेंद्र गुढा यांचे शिवसेनेत स्वागत आहे. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राजस्थान ही वीरांची भूमी आहे. इथल्या जनतेला नमन करतो, अभिवादन करतो. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे महाराणा प्रताप यांचे नाव गाजले आहे. राजस्थान आणि महाराष्ट्राचा स्वभाव गुण एकसारखा आहे. तो म्हणजे वीरता, शूरता, एकसमानता. आता या गुणाचे मिलन झाले आहे.
मी एवढेच सांगेन की, मागच्या वर्षी इथले मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले होते. त्यांनी सांगितले होते की, तुमच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. पण त्यांनीच तुमचे मंत्रीपद काढून घेतले. याचे उत्तर जनता त्यांना देईल. तुम्ही मंत्रीपद सोडले. पण सत्य सोडले नाही, यासाठी तुमचे कौतूक. तुम्ही जसा मंत्रीपदाचा त्याग केला, तशीच वर्षभरापूर्वी मी देखील सत्ता सोडली. मंत्रीपद सोडले आणि केवळ बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्येचा त्याग केला, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे आहोत, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.
कोण आहेत राजेंद्रसिंह गुढा?
राजेंद्रसिंह गुढा हे राजस्थानमधील काँग्रेसच्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले आहेत. परंतु जुलै महिन्यात घडलेल्या एका मोठ्या राजकीय घटनेमुळे गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. राजस्थानमध्ये अधिवेशन सुरू असताना गुढा यांनी त्यांच्याच सरकारविरोधात आरोप केले. अशोक गेहलोत यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराची माहिती असलेल्या लाल डायरीचे विधानसभेत वाचन करण्यात यावे, अशी मागणी गुढा यांच्याकडून करण्यात आली. परंतु त्यांच्या या मागणीला फेटाळत 24 जुलैला गुढा यांना विधानसभा सभागृहातूनही बाहेर काढण्यात आले, मार्शलचा आधार घेऊन त्यांना सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गेहलोत यांच्या सरकारची डोकेदुखी वाढली.