आपले आधुनिक प्रजासत्ताक युवा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

draupadi murmu

संविधान लागू झाल्याच्या दिवसापासून आतापर्यंतचा आपला प्रवास विलक्षण राहिला असून यातून अनेक देशांना प्रेरणाही मिळाली आहे. प्रत्येक नागरिकाला भारताच्या यशोगाथेचा अभिमान आहे. प्रजासत्ताक दिन साजरा करताना एक राष्ट्र म्हणून आपण सर्वांनी मिळून जे यश प्राप्त केले आहे त्याचा उत्सव आपण साजरा करतो. भारत जगातल्या सर्वात प्राचीन काळापासून नांदणार्‍या संस्कृतींपैकी एक आहे. भारताला लोकशाहीची जननी म्हटले जाते. तरीही आपले आधुनिक प्रजासत्ताक युवा आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या भाषणात राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला असंख्य आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. दीर्घ परकीय राजवटीच्या अनेक दुष्परिणामांपैकी दोन परिणाम होते ते म्हणजे हलाखीचे दारिद्र आणि निरक्षरता, मात्र तरीही भारत डगमगला नाही. आशा आणि विश्वास यांच्या बळावर आपण मानव जगताच्या इतिहासातला अनोखा प्रयोग हाती घेतला. इतका विशाल आणि वैविध्य असणारा जनसमुदाय एक राष्ट्र म्हणून बांधला जाणे हे केवळ अभूतपूर्व होते. आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्व भारतीय आहोत, हा विश्वास घेऊन आपण हे साध्य केले. विविध पंथ आणि असंख्य भाषांमुळे आपण विभागले गेलो नाही तर जोडले गेलो. म्हणूनच प्रजासत्ताक लोकशाही म्हणून आपण यशस्वी ठरलो. हेच भारताचे मूलतत्त्व आहे.

हेच मूलतत्त्व संविधानाच्या केंद्रस्थानी राहिले आहे आणि काळाच्या कसोटीवरही टिकून राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यातल्या आदर्शांना अनुरूप आपल्या प्रजासत्ताकाला बळ देणार्‍या संविधानाची निर्मिती करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीचा उद्देश स्वातंत्र्यप्राप्ती हा होताच. त्याचबरोबर भारतीय आदर्श पुन्हा स्थापन करण्याचाही होता. त्या दशकांमधल्या संघर्ष आणि बलिदानाने केवळ परकीय राजवटीपासूनच नव्हे तर आपल्यावर लादली गेलेली मूल्ये आणि संकुचित जागतिक दृष्टिकोनापासूनही स्वतंत्र होण्यासाठी बळ दिले. शांतता, बंधुत्व आणि समानता या आपल्या शतकानुशतकांच्या मूल्यांचा पुन्हा अंगीकार करण्यासाठी क्रांतिकारक आणि सुधारकांनी, द्रष्ट्या आणि आदर्शवादी व्यक्तित्वांबरोबर काम केले. आधुनिक भारताच्या वैचारिक जडणघडणीला आकार देणार्‍या या थोरांनी आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वत: – अर्थात आमच्याकडे चोहो बाजूंनी चांगले विचार यावेत – या वेदातल्या उपदेशाप्रमाणे पुरोगामी विचारांचेही स्वागत केले. प्रदीर्घ आणि सखोल विचारमंथनातून आपले संविधान तयार झाले, असेही त्यांनी सांगितले.

आपला हा पायाभूत दस्तऐवज जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतीच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाबरोबरच आधुनिक विचारांनीही प्रेरित आहे. आपला देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच ऋणी राहील, ज्यांनी मसुदा समितीची अध्यक्षता केली आणि संविधानाला अंतिम स्वरूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संविधानाचा प्राथमिक मसुदा तयार करणारे कायदेतज्ज्ञ बी. एन. राव आणि संविधान निर्मितीत सहाय्य करणारे इतर तज्ज्ञ आणि अधिकार्‍यांचेही आज आपण स्मरण करायला हवे. या संविधान सभेच्या सदस्यांमध्ये भारताची सर्व क्षेत्रे आणि समुदायांचे प्रतिनिधित्व होते याचा आपल्याला अभिमान आहे. संविधान निर्मितीत संविधान सभेच्या १५ महिला सदस्यांचेही योगदान राहिले आहे.

संविधानात अंतर्भूत आदर्शांनी आपल्या प्रजासत्ताकाला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. या वाटचालीत आपल्या देशाने गरीब आणि निरक्षर या स्थितीतून बाहेर पडून आत्मविश्वासाने परिपूर्ण राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर स्थान प्राप्त केले आहे. संविधान निर्मात्यांच्या सामूहिक बुद्धिमत्तेतून मिळालेल्या मार्गदर्शनावाचून ही प्रगती शक्य नव्हती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य थोर व्यक्तिमत्वांनी आपल्याला एक आराखडा आणि नैतिक चौकट दिली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण बर्‍याच प्रमाणात या अपेक्षांची पूर्तताही केली आहे, मात्र गांधीजींचा ‘सर्वोदय’ अर्थात सर्वांचे उत्थान हा आदर्श वास्तवात आणण्याचे काम बाकी आहे याची जाणीव आपल्याला आहे. तरीही सर्व आघाड्यांवर आपण उत्साहवर्धक प्रगती केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.