भारताच्या राष्ट्रपतींना एका महिन्यात मिळतो इतका पगार, निवृत्तीनंतर काय मिळतात सुविधा?

भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींच्या निवडणुकीची ( Presidential elections) घोषणा केली आहे. त्यामुळे देशाला आता लवकरच नवे राष्ट्रपती (President ) मिळणार आहेत. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे आता १८ जुलैला यासाठी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल लागणार आहे. निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींची निवडणूक

राष्ट्रपती भारताचे प्रमुख असण्यासोबतच ते भारताचे प्रथम नागरिक देखील आहेत. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ देखील आहेत. भारतात राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांद्वारे केली जाते, ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे, राज्यांच्या विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांचे निवडून आलेले सदस्य असतात.

राष्ट्रपती भवन

राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात राहतात. भारताचे राष्ट्रपती भवन हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रपती भवन आहे. भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते भारताच्या संसदेद्वारे ठरवले जातात. भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन ५ लाख रूपये दरमहा आहे. भारताच्या राष्ट्रपतींना मासिक वेतनाव्यतिरिक्त अनेक भत्तेही मिळतात.

राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. नवी दिल्ली येथे स्थित असलेल्या राष्ट्रपती भवनात ३४० कॅमेरे आणि २,००,००० चौरस फूट क्षेत्रफळ आहे. भारताच्या राष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय सेवा मिळते. तसेच राष्ट्रपती कस्टम-बिल्ट ब्लॅक मर्सिडीज बेंझ S600 (W221) पुलमॅन गार्डसाठी पात्र असतात.

निवृत्तीनंतर काय?

सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रपती अनेक भत्त्यांसाठी पात्र असतात. निवृत्तीनंतर त्यांना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळते. यासोबतच राष्ट्रपतींच्या पत्नीला दरमहा ३०,००० रुपये सचिवीय मदत मिळते. पेन्शनसोबतच त्यांना भाडेमुक्त बंगला देखील दिला जातो. यासोबतच दोन मोफत लँडलाईन आणि एक मोबाईल फोन दिला जातो. एवढेच नाही तर निवृत्त झाल्यानंतर त्यांना पाच खासगी कर्मचाऱ्यांचा खर्च ६० हजार रुपये इतका दिला जातो. यासोबतच ट्रेन किंवा विमानाने मोफत प्रवासही दिला जातो.


हेही वाचा : राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, १८ जुलैला होणार मतदान