राष्ट्रपती राजपक्षेंचा राजीनामा मंजूर, पीएम विक्रमसिंघे घेणार कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची शपथ

श्रीलंकेतील नागरिकांना आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागत आहे. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कोलंबोच्या रस्त्यांवर लोकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. आंदोलक गोतबायांच्या राजीनाम्याकडे आपला विजय म्हणून पाहत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा अनेकांनी कोलंबोच्या रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला. यावेळी फटाके फोडण्यात आले, लोक मस्ती करताना दिसले. दुसरीकडे, आंदोलकांनी ताब्यात घेतलेल्या महत्त्वाच्या सरकारी इमारतींमधूनही माघार घेण्यास सुरुवात केली आहे.

पीएम विक्रमसिंघे घेणार कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची शपथ

श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, गोतबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे ते म्हणाले. नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी उद्या खासदारांना बोलावण्यात आले आहे.

गोतबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा ई- मेलद्वारे श्रीलंकेतील संसदेच्या अध्यक्षांना पाठवला. गोतबाया राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवसाचा मुक्काम केल्यानंतर ते सिंगापूरला पोहोचले. सिंगापूर सरकारने गोतबाया राजपक्षे हे खासगी भेटीसाठी आल्याचे म्हटले आहे. सिंगापूर सरकारने म्हटले आहे की, गोतबाया यांनी आमच्याकडे आश्रय मागितला नाही. आम्हीही त्यांना आश्रय दिला नाही.

श्रीलंकेच्या लष्कराने आंदोलकांना सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे राहण्याचे आवाहन केले आहे. सशस्त्र दलाच्या सदस्यांना मानवी जीवनास धोका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास बळ वापरण्याची कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे.


हेही वाचा :अन्न संकट सोडवण्यासाठी देशात बनवले जाणार फूड पार्क, अमेरिका आणि यूएई करणार सहकार्य