घरदेश-विदेशभारताला खऱ्या अर्थानं 'फार्मसी ऑफ द वर्ल्ड' म्हटल जात आहे - राष्ट्रपती

भारताला खऱ्या अर्थानं ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हटल जात आहे – राष्ट्रपती

Subscribe

भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

आपल्या देशात आर्थिक मंदी काही काळासाठीच राहीली. आता आपल्या अर्थव्यवस्थेनं पुन्हा एकदा वेग पकडला आहे. आत्मनिर्भर भारतानं कोरोना विषाणू पासून बचावासाठी आपली स्वतःची लस बनवली आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम चालवत आहोत जी इतिहासात एक प्रकारचा मोठा प्रकल्प म्हणून गणली जाईल. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी, प्रशासन तसच आरोग्य सेवेशी संलग्न सर्व जण, सर्वशक्तीनिशी कार्यरत आहेत. मी देशवासीयांना आग्रह करतो कि आपण सर्वांनी, ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आपल्या आरोग्याच्या हितासाठी या लसरुपी संजीवनीचा लाभ अवश्य घ्या आणि लस नक्की टोचून घ्या. आपलं आरोग्यच आपल्या उन्नतीचे मार्ग मोकळे करून देतं. आज भारताला खऱ्या अर्थानं, फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणजेच जगाचं औषधालय असं म्हटलं जात आहे, कारण आपण अनेक देशांमधल्या लोकांची वेदना कमी करण्यासाठी आणि कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी, औषधं तसच आरोग्यसेवेची अन्य उपकरणं, जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करून देत आहोत. आता तर आपण लसी सुद्धा अन्य देशांना पुरवत आहोत, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून काढले आहेत.

प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही अनेक आव्हानं आणि कोविड सारख्या संकटातही आमच्या शेतकरी बंधू-भगिनींनी कृषी उत्पादनांची कमतरता निर्माण होऊ दिली नाही. त्यामुळेच हा कृतज्ञ देश आमच्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. ज्याप्रमाणे आमचे मेहनती शेतकरी देशाची अन्न सुरक्षा अबाधित राखण्यात यशस्वी झाले आहेत, त्याचप्रमाणे आमच्या सैन्याचे शूर जवान कठीण परिस्थितीतही देशाच्या सीमांचं संरक्षण करत आले आहेत. आमचे सैनिक भारताच्या संरक्षणाची जबाबदारी, क्षण न क्षण पार पाडत आहेत. आमच्या सैनिकांचं शौर्य, देशप्रेम आणि बलिदान यांचा आम्हा सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो.

- Advertisement -

देशाची अन्न सुरक्षा, लष्करी सुरक्षा, नैसर्गिक संकट आणि रोगराईपासून सुरक्षा, तसच विकासाच्या अनेक क्षेत्रांमध्ये, ‌आमच्या वैज्ञानिकांनी आपल्या योगदानानं, राष्ट्रीय प्रयत्नांना बळ मिळवून दिलं आहे. अंतराळा पासून शेती-बागायतीं पर्यंत, शिक्षण संस्थांपासून रुग्णालयां पर्यंत, वैज्ञानिक मंडळींनी आमचं जीवन आणि दैनंदिन कामकाजात सुलभता आणली आहे. रात्रंदिवस परिश्रम करत, कोरोना विषाणूला डीकोड करून, तसच खूप कमी अवधीत लस बनवून आमच्या वैज्ञानिकांनी, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक नवा इतिहास रचला आहे. देशात या महामारीवर नियंत्रण मिळवण्यात, तसंच विकसित देशांच्या तुलनेत मृत्युदर नियंत्रीत राखण्यात, आमच्या वैज्ञानिकांनी, डॉक्टर-प्रशासन आणि इतर संबंधित लोकांच्या साथीनं अमूल्य असं योगदान दिलं आहे. म्हणूनच आमचे सगळे शेतकरी, सैनिक आणि वैज्ञानिक, विशेष अभिनंदनाला पात्र आहेत आणि कृतज्ञ देश प्रजासत्ताक दिनाच्या शुभ प्रसंगी राष्ट्रपतींनी या सर्वांचं अभिनंदन केले आहे.

गेल्यावर्षी संपूर्ण मानवजात, एका विक्राळ अशा संकटाचा सामना करत असताना जणू स्तब्ध झाली होती. याच दरम्यान मी भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांचं मनन करत होतो. मला असं वाटतं, बंधुत्वाच्या आमच्या याच घटनात्मक आदर्शाच्या जोरावरच, या संकटाचा प्रभावी मुकाबला करणं शक्य होऊ शकलं आहे. कोरोनाविषाणूरुपी शत्रु विरोधात सर्व देशवासीयांनी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन, त्याग, सेवा आणि बलिदानाचा अनुकरणीय आदर्श घालून देत एकमेकांचं रक्षण केलं आहे. मी या निमित्तानं, ते सर्व डॉक्टर-परिचारिका-आरोग्य सेवक, आरोग्यसेवेशी संबंधित प्रशासक आणि सफाई कर्मचारी यांचा इथे उल्लेख करू इच्छितो, ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांची देखभाल केली आहे. याच प्रयत्नात कित्येकांनी आपले प्राणही गमावले. या बरोबरच या महामारीनं देशातल्या सुमारे दीडलाख नागरिकांचे बळी घेतले. अशा सर्व शोकग्रस्त कुटुंबीयांप्रति राष्ट्रपतींनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. करतो. कोरोना विरुद्धच्या या लढाईत आघाडीचे योद्धे म्हणून आमच्या सामान्य नागरिकांनीही असामान्य योगदान दिलं आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीतले लोक जेव्हा या कालखंडाचा इतिहास जाणून घेतील, तेव्हा, या आकस्मिक संकटाचा ज्या साहसानं आपण सर्वांनी सामना केला आहे, त्यापुढे ते अत्यंत श्रद्धापूर्वक नतमस्तक होतील, असे राष्ट्रपती म्हणाले.

- Advertisement -

भारताची दाट लोकसंख्या, सांस्कृतिक परंपरांची विविधता, तसंच नैसर्गिक आणि भौगोलिक आव्हानांमुळे, कोरोनापासून रक्षण करणं आपल्या सर्वांसाठी खूप खडतर असं काम होतं. तरीही या विषाणूच्या संसर्गाचा प्रकोप रोखण्यात आपण बऱ्याच अंशी यशस्वी झालो आहोत. या गंभीर संकटातही अनेक क्षेत्रांमधले आपले उपक्रम, आपण यशस्वीपणे पुढे नेले आहेत. या महामारी मुळे आमचा शालेय विद्यार्थीवर्ग आणि युवा पिढी यांच्या शिक्षण प्रक्रियेत अडथळे येण्याचा धोका निर्माण झाला होता. पण आमच्या शिक्षण संस्था आणि शिक्षकांनी नवं तंत्रज्ञान वेगानं आत्मसात करत, अध्ययन प्रक्रिया निरंतर सुरू राहील याची काळजी घेतली.

आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया, सावधगिरीनं, टप्प्याटप्प्यनं राबवण्यात आली. ही पद्धत परिणामकारक ठरली आणि अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मजबूत होण्याचे संकेत आता दिसू लागले आहेत. वस्तू आणि सेवाकर संकलनातल्या विक्रमी वाढीची नुकतीच झालेली नोंद आणि परदेशी गुंतवणुकीसाठी आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून भारताचा जागतिक पटलावर उदय होणं, आपली अर्थव्यवस्था वेगानं पुर्वपदावर येण्याचं निदर्शक आहे. सरकारनं, मध्यम आणि लघु उद्योगांना चालना दिली आहे, कर्ज सहजपणे उपलब्ध करून देत उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिलं आहे आणि व्यापारात नवनव्या मार्गांना प्रेरणा देण्यासाठी, अनेक पावलं उचलली आहेत.

माझ्या मते 2020 हे वर्ष, एक शिकवण देणारं वर्ष म्हणून मानलं पाहिजे. गेल्या वर्षभरात निसर्गानं खूप कमी वेळात आपलं स्वच्छ आणि निर्मळ स्वरूप पुन्हा एकदा मिळवलं. निसर्गाचं अशा प्रकारचं नितळ सौंदर्य बऱ्याच काळानंतर पहायला मिळालं. एक प्रकारे निसर्गानं हा स्पष्ट संदेश दिला आहे की छोटे छोटे प्रयत्न फक्त नाईलाजास्तव नाहीत, तर अनेक मोठमोठ्या प्रयत्नांसाठी पूरक ठरतात. मला विश्वास आहे, भविष्यात अशा प्रकारच्या महामारीचा धोका कमी करण्याच्या दृष्टीनं, हवामान बदलाच्या मुद्याला जागतिक स्तरावर प्राधान्य दिलं जाईल असेही ते म्हणाले.

आत्मनिर्भर भारत अभियान, एका जनआंदोलनाचं रूप घेत आहे. हे अभियान, आपल्या नवभारताच्या कल्पनेनुसारचे राष्ट्रीय संकल्प पूर्ण करण्यातही सहाय्यक ठरेल, जे संकल्प देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापर्यंत म्हणजे 2022 सालापर्यंत गाठण्याचं लक्ष्यं आपण ठेवलं आहे. प्रत्येक कुटुंबाला पायाभूत सुविधांनी युक्त असं पक्कं घर देण्यापासून, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यापर्यंत सर्व महत्वपूर्ण उद्दिष्टांच्या दिशेनं पुढे जात, आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिवसाचं ऐतिहासिक ध्येय गाठू. नवभारतातल्या सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी, आपण शिक्षण-आरोग्य-पोषक आहार, वंचित समाज घटकांचा उद्धार आणि महिलांच्या कल्याणावर विशेष जोर देत आहोत असे ते म्हणाले.

गेल्यावर्षी अनेक आघाड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आपल्यासमोर आली. आपल्याला आपल्या सीमांवर विस्तारवादी कारवायांचा सामना करावा लागला. पण आपल्या शूर जवानांनी ते प्रयत्न हाणून पाडले. यात आपले 20 जवान हुतात्मा झाले. आपण सगळे देशवासीय त्या जवानांचे कृतज्ञ आहोत. खरं तर आपण शांततेप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहोत, तरीही आपलं भूदल-वायुदल आणि नौदल आपल्या सुरक्षितते विरोधात होणारं कुठलही दु:साहस निष्फळ करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्जं आहे. यावर्षी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत, अस्थायी सदस्याच्या रुपात स्थान मिळवलं, ते या वाढत्या प्रभावाचं निदर्शक आहे. जागतिक स्तरावर अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत आपले संबंध कैक पटीनं अधिक घनिष्टं झाले आहेत. आपल्या सचेतन लोकशाहीच्या आधारावर भारतानं, एक जबाबदार आणि विश्वसनीय देशाच्या रूपात आपला लौकिक वाढवला आहे.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -