President Ramnath Kovind : राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं योगदान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार

देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राने मोठे योगदान दिले असून भविष्यातही महाराष्ट्र अग्रेसर असेल, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले आहे. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ कोविंद यांच्या हस्ते झाला. सविता कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम जहागीरदार व्यासपीठावर उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने सर्व पाहुण्यांचे दत्त प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.

भविष्यातही महाराष्ट्र अग्रेसर असेल

राष्ट्रीयता आणि सामाजिक सद्भभावनेचा स्त्रोत म्हणून लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा गणेशोत्सवच महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या जनआंदोलनाचे माध्यम झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीमध्ये सामाजिक आंदोलन सुरू करून मानवतेसाठी आदर्श निर्माण केला. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राने मोठं योगदान दिलं असून भविष्यातही महाराष्ट्र अग्रेसर असेल, असं रामनाथ कोविंद म्हणाले.

महाराष्ट्राची भूमीही थोर आहे

गणपती मंदिर, दत्त मंदिर यामुळे पुण्यात एक नवी चेतना मिळते. ही भूमीच महान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांनी या भूमीला पावन केले आहे. देशातील मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी इथेच सुरू केली. डॉ. आंबेडकरांचे आंदोलन इथूनच सुरू झाले. त्यामुळे महाराष्ट्राची भूमीही थोर आहे, कोविंद म्हणाले.

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यामुळे भारतामध्ये नवीन चेतना जागृत झाली. दगडूशेठ दाम्पंत्याने पुण्यात गणपती उत्सव आणि लक्ष्मीबाई दगडूशेठ यांनी दत्त मंदिराच्या माध्यमातून नवीन ऊर्जा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सरदारांनी भारताची एकजूट करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. आनंदी गोपाळ जोशी या देखील देशातील पहिल्या डॉक्टर महाराष्ट्रातीलच होत्या, असं राष्ट्रपती म्हणाले.


हेही वाचा : मोठी बातमी! हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा