घरदेश-विदेशराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर; 14 सदस्यीय समन्वय समितीची आज दिल्लीत पहिली...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर; 14 सदस्यीय समन्वय समितीची आज दिल्लीत पहिली बैठक

Subscribe

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रमुख जेपी नड्डा यांच्या अध्यतेखाली ही बैठक पार पडणार आहे

आगामी राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या समन्वय समितीची पहिली बैठक होणार आहे. नवी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या तयारीची रूपरेषा तयार करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी आणि राज्य घटकांशी समन्वय साधण्यासाठी 14 सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली आहे. समितीच्या पहिल्या बैठकीत सदस्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या ठरवल्या जाऊ शकतात, असे मानले जात आहे.

भाजपच्या वतीने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर एकमत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक म्हणून नियुक्त केले आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि सीटी रवी हे या समितीचे सहसंयोजक आहेत. या टीममध्ये केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, अश्विनी वैष्णव, सर्बानंद सोनोवाल, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष डीके अरुणा आणि राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा यांचा समावेश आहे. .

- Advertisement -

या निवडणूक व्यवस्थापन समितीत भाजप महिला आघाडीच्या प्रमुख वनथी श्रीनिवास, सिलचरमधून लोकसभेचे खासदार डॉ राजदीप रॉय आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांचाही सहभाग आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीत समितीच्या सदस्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर चर्चा होणार आहे. 14 सदस्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. हे सदस्य तेथे भेट देऊन समन्वयाचे काम करतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्रित उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा उमेदवार कोण, याबाबत विचारमंथन सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनीही जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचे कारण देत आपले नाव मागे घेतले आहे. आता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांचे नाव चर्चेत आहे.

- Advertisement -

आगामी राष्ट्पती निवडण्यासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार असून मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख 30 जून असून, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. मात्र त्यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपुष्टात येणार आहे.


शिवसेना – भाजपात उड्डाणपुलासाठी श्रेयवाद ; बॅनरबाजी, घोषणाबाजी आणि गोंधळात लोकार्पण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -