किरकोळ बाजारात खाद्यान्न तेलांच्या किमती घसरल्या; टोमॅटो, डाळीही स्वस्त

देशात आठवड्याभरात खाद्य तेल, टोमॅटो आणि डाळींच्या किंमतीत घट झाल्याचा दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाईने पिचलेल्या सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. किरकोळ बाजारात खाद्यन्न वस्तूंच्या (Edible products) किंमतीत घट झाली आहे. तसेच, डाळी, टोमॅटोच्या किंमतीतही घट झाली आहे. केंद्र सरकारने खाद्य वस्तूंच्या किंमतींची ताजी आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, देशात आठवड्याभरात खाद्य तेल, टोमॅटो आणि डाळींच्या किंमतीत घट झाल्याचा दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने केला आहे. (Prices decreases of edible oil, tomato)

हेही वाचा – सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या दरात ५० ते ६० रूपयांची घट, जाणून घ्या

केंद्रीय अन्न आणि नागरी मंत्रालयाने ७ जुलै रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मोहरी आणि पाम तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. पाम तेलात महिन्याभरात ४ रुपयांनी घट झाली असून जून महिन्यात १८२.४० रुपये पाम तेल होते, या किंमतीत घसरण होऊन आता १७८.०१ रुपयांवर पाम तेलाची किंमत आली आहे. तर, सोयाबीन तेलाच्या भावात २.२९ टक्क्यांनी घसरण झाली असून वनस्पतीच्या तेलाचे भाव १.९३ टक्के घसरले आहे. तसेच, सूर्यफूल तेलाचा भाव ३.९३ टक्क्यांनी कमी झाला आहे.

जागतिक बाजारपेठेत पाम तेल स्वस्त

जागतिक बाजारपेठेत पाम तेलाचा भाव ३५० ते ४०० डॉलरने कमी झाला आहे. त्यामुळे पाम तेल आयात स्वस्त झाले आहे. परिणामी तेलाच्या दरात १० ते १५ रुपयांची कपात झाली आहे. तसेच, बुधवारी केंद्र सरकारने तेल उत्पादकांसोबत बैठक घेतली असून दरांत आणखी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे येत्या काळात तेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – खाद्यतेल स्वस्त, खाद्य तेलाच्या दरात प्रति लिटर सरासरी 20 रुपयांची कपात

टोमॅटो स्वस्त, कांदे-बटाटे महाग

एकीकडे खाद्यान्न तेलाच्या किंमतीत घट झाली असताना टोमॅटोचेही भाव उतरले आहेत. गेल्या महिन्यात टोमॅटोच्या दरांनी शंभरी गाठली होती. मात्र, आता १४.७३ टक्क्यांनी भाव कमी झाला आहे. मात्र, दुसरीकडे कांदे आणि बटाटे यांच्या किंमतीत ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, विविध डाळींच्या किंमतीही घसरल्या असल्याची माहिती सरकारने दिली आहे.