Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश कर्नाटकात काँग्रेसवर पंतप्रधानांचा हल्लाबोल, पवन खेडांचा मोदींना सवाल ...मग तुम्ही रामाचा अपमान...

कर्नाटकात काँग्रेसवर पंतप्रधानांचा हल्लाबोल, पवन खेडांचा मोदींना सवाल …मग तुम्ही रामाचा अपमान केला का?

Subscribe

बजरंग दल बंदीच्या कथित घोषणेनंतर काँग्रेसवर भाजपकडून ह्ललाबोल सुरु आहे. गुरुवारी राज्यात सर्व हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.

Karnataka Assembly Election 2023 बंगळुरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंगबली सर्वात मोठा मुद्दा झाला आहे. काँग्रेसने त्यांच्या घोषणापत्रात बजरंग दलावर बंदीचे आश्वासन दिले आहे. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्ला केला आहे. तर भारतीय जनता पक्षानेही (भाजप) यावरुन राज्यात काँग्रेसला घेरण्यास सुरुवात केली आहे. (BJP workers chant Hanuman Chalisa in Karnataka)

भाजपने त्यांच्या कार्यकर्त्यांना केलेल्या सूचनेनुसार गुरुवारी संध्याकाळी कर्नाटकातील हनुमान मंदिरांत हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले आहे. झाले असे, की काँग्रेसच्या घोषणापत्रात हिंदूत्ववादी संघटना बजरंग दल आणि इस्लामिक संघटना पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) यांची तुलना केली आहे. काँग्रेसचा आरोप आहे या दोन्ही संघटना दोन समुदायांमध्ये वादाचे कारण ठरत आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आली तर या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

विश्व हिंदू परिषदेची (VHP) युवा शाखा बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण कर्नाटकमध्ये हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेशवजा सूचना भाजपकडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या संघटनेचे कर्नाटकच्या सीमा भागात आणि मलनाडमध्ये वर्चस्व आहे.

काँग्रेसने बजरंग दल संघटनेवर कथित बंदीची घोषणा केल्यानंतर भाजपकडून हा बजरंगबलीचा अपमान असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय मंत्री आणि कर्नाटक निवडणूक समितीचे संयोजक शोभा करंदलाजे यांनी म्हटले आहे, की सोनिया आणि राहुल गांधी यांनी बजरंगबलीला बोलण्याची हिंमत कशी केली, त्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणासाठी असे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयनगर येथील जाहीर सभेत म्हटले, की आधी काँग्रेसने रामाला कुलूपबंद केले होते. आणि आता ते ‘जय बजरंग बली’ची घोषणा देणाऱ्यांना आत टाकण्याच्या तयारीत आहेत.
दुसऱ्या दिवशी मोदींनी विविध ठिकाणी झालेल्या तीन सभांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना अधिक चेतवण्यासाठी भारत माता की जयच्या घोषणेसोबत बजरंग बली की जयचाही जयघोष केला.

पंतप्रधानांच्या आरोपांवर काँग्रेसचे प्रवन खेडा यांनी म्हटले आहे की, भाजपची गोव्यात सत्ता असताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राम सेनेवर बंदी घातली होती. तेव्हा भाजपने काय रामाचा अपमान केला होता का? असा सवाल पवन खेडांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली तेव्हा त्यांनी भगवान शिवा (शंकर) किंवा शिवाजी महाराजांचा अपमान केला होता का? असाही सवाल खेडा यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे.

मोदींच्या भाषणांवर काँग्रेसने म्हटले आहे, की भगवान हुनमान आणि बजरंग दल यांची तुलना होऊ शकत नाही. काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी आणि पक्षाचे महासचिव रणदीप सूरजेवाला म्हणाले, ‘भगवान हनुमान हे पावित्र्याचे प्रतिक आहे. हनुमान हे श्रद्धा, सेवा आणि बलिदानाचे प्रतिक आहेत. त्यांची तुलना कोणत्याही व्यक्ती वा संघटनेशी होऊ शकत नाही. पंतप्रधान लाखों हनुमान भक्तांच्या भावना दुखावत आहेत.’

कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे.

- Advertisment -