गेल्या वर्षी 5G सेवा सुरू करण्यात आली. पण आजही अनेक लोकं ही 4G ची सेवा वापरत आहेत. तर अनेकांकडून 4G ची सेवा नीट सुरू नसल्याची नेहमीच तक्रार करण्यात येते. पण असे असले तरी यंदाच्या वर्षात 6G ची सेवा सुद्धा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आली आहे. 5G सेवा सुरू करण्यात विलंब होत असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6G ची घोषणा केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. २२ मार्च) इंडिया 6G चे व्हिजन दस्तावेज सादर केले आहेत. यासोबतच त्यांनी 6G संशोधन आणि विकास लॉन्च केली आहे. हे दस्तावेज देशात 6G तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तर 5G लाँचच्या वेळीच पंतप्रधान मोदींनी 6G साठी तयारी सुरू करण्यात आल्याचे सांगितले होते.
6G चे व्हिजन डॉक्युमेंट सादर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘हे दशक हे भारताचे तंत्रज्ञान दशक आहे. भारताचे दूरसंचार आणि डिजिटल मॉडेल सहज, सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि चाचणी केलेले आहे. ITU (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन) एरिया ऑफिस आणि इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींनी या गोष्टी सांगितल्या.
6G व्हिजन डॉक्युमेंट कोणी तयार केले?
भारताच्या 6G चे व्हिजन दस्तावेज हे 6G वर आधारित असणाऱ्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुपने तयार केले आहे. हा गट नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू झाला आहे. या गटात विविध मंत्रालये आणि विभाग, संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक, दूरसंचार सेवा प्रदाते आणि उद्योगातील लोकांचा समावेश आहे. या गटाचे काम भारतात 6G लाँचसाठी रोडमॅप तयार करणे आहे.
दरम्यान, भारताच्या 6G व्हिजन दस्तावेजामुळे आणि 6G टेस्ट बेडमुळे देशाला नवकल्पना सक्षम करण्यास, क्षमता निर्माण करण्यास आणि नवीन तंत्रज्ञानाचा जलद अवलंब करण्यास मदत होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
Speaking at inauguration of ITU Area Office & Innovation Centre in Delhi. Initiatives like 6G Test Bed & 'Call Before You Dig' app are also being launched. https://t.co/z6hRdeTPbB
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, पीएम मोदींनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या शेवटी सांगितले होते की सरकार 6G लाँचची तयारी करत आहे, जे या दशकाच्या अखेरीस लाँच केले जाईल. यासोबतच त्यांनी तरुणांना आणि नव्याने काम सुरू करणाऱ्यांना या संधीचा लाभ घेण्यास सांगितले होते आणि नवनवीन उपाय शोधण्याचे आवाहन देखील केले होते. दरम्यान, भारतात मागच्या वर्षी 1 ऑक्टोबर या दिवशी 5G सेवा सुरू करण्यात आली होती. 5G स्पेक्ट्रम लिलावामध्ये दूरसंचार विभागाला तब्बल 1 कोटी 50 लाख इतकी किंमत मिळाली होती.
हेही वाचा – भारताची रणनीती! दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाची सुरक्षा काढली