मुंबई : आपल्या देशात सध्या सरकार प्रायोजित करमणुकीचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील लोकांची करमणूक चांगली करीत आहेत. दिल्लीत येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना, पंतप्रधान मोदी यांना ‘वन टू वन’ भेटायची इच्छा आहे, पण मोदी स्वत: ‘जी-20’च्या आयोजनात व पाहुण्यांच्या सरबराईत इतके गुंतले की, त्यांना खरोखरच 20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटण्यास वेळ नाही, असे वृत्त भाजप गोटातून प्रसिद्ध झाले. ही करमणूकच आहे! दिल्लीत परदेशी पाहुणे भरपूर, पण वातावरण निरस आहे. प्रसिद्धीचा हव्यास यापलीकडे काही नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा – G20 Delhi: भारतातील G-20 शिखर परिषदेत काय झालं? देश, विदेशी मीडियाने काय म्हटलंय; वाचा सविस्तर
‘जी-20’ संमेलनानिमित्त दिल्ली सजविण्यात आली आहे. 20 देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत उतरले. या संमेलनाचे यजमानपद भारतास मिळाले. इतक्या देशांचे राष्ट्रप्रमुख राजधानीत येत असल्याने सामान्य जनतेसाठी दिल्लीचे रस्ते साफ बंद करून ठेवले. विमान वाहतुकीवर निर्बंध आले. मेट्रो ट्रेनही बंद केल्या. लोकांचे व्यवहार, दळणवळण रोखले. इतर देशांतील अशा संमेलनास मी गेलो आहे. लोकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने असे सोहळे साजरे होत असतात, पण आपल्या देशात असे सोहळे म्हणजे जनतेला ताण, असे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरात म्हटले आहे.
‘जी-20’साठी दिल्लीत 20 देशांचे राष्ट्रप्रमुख येत आहेत. त्यात अमेरिकेचे ज्यो बायडेन आहेत. चीन आणि रशियाचे राष्ट्रप्रमुख त्यात नाहीत. त्यामुळे सोहळा थोडा फिका पडला. दिल्लीच्या वृत्तपत्रांत एक बातमी प्रसिद्ध झाली. परदेशी पाहुणे देशाच्या राजधानीत येत आहेत. दिल्लीतील गरिबी, बजबजपुरी, झोपड्या दिसू नयेत म्हणून अनेक असे भाग रंगतदार पडदे लावून झाकून ठेवले गेले. हे दारिद्रय़ गेल्या आठ-नऊ वर्षांत नष्ट करण्यात सरकारला अपयश आले. त्यामुळे झाकून ठेवण्याची वेळ आली, अशी खरपूस टीकाही त्यांनी केली आहे.
हेही वाचा – बॅनर लावून भावी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री होता येत नाही त्यासाठी…; अजित पवार स्पष्टच बोलले
आपल्या देशाच्या घटनेने मंजूर केलेल्या ‘नावा’लाच घाबरणारे सरकार आम्ही प्रथमच पाहिले. मोदींच्या सरकारने ‘इंडिया’चे नामांतर परस्पर करून रिपब्लिक ऑफ भारत केले. विदेशी पाहुणे येतील व जातील. आज ‘जी-20’ भारतात झाले. पुढच्या काळात ते इंडोनेशियात होणार आहे. त्या इंडोनेशियातही थोडे ‘इंडिया’ आहे. त्यात इंडियाचा अंश आहे म्हणून मोदी तेथे जाण्याचे टाळतील काय? अर्थात, ती वेळ येणार नाही. 2024 नंतर ‘मदर आाफ डेमाक्रसी’त बदल होतील. नवे पंतप्रधान देशाला लाभतील. ज्यांचे लोकशाही प्रेम हे ढोंग नसेल व सत्ता म्हणजे व्यापार नसेल! तोपर्यंत सरकारी करमणूक सहन करूया, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.