घर देश-विदेश पंतप्रधान मोदी म्हणाले, तीन दुष्प्रवृत्तींशी लढावे लागेल; काँग्रेसने सांगितला - लड़ने का...

पंतप्रधान मोदी म्हणाले, तीन दुष्प्रवृत्तींशी लढावे लागेल; काँग्रेसने सांगितला – लड़ने का तरीका…

Subscribe

मुंबई : आपल्याला स्वप्नांची पूर्तता करायची असेल, संकल्प साध्य करायचे असतील तर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन दुष्प्रवृत्तीविरोधात आपण सर्वसामर्थ्याने लढा देणे ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावर काँग्रेसने पलटवार करताना या लढ्याच्या पद्धती सांगितल्या आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, मंगळवारी 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. सोबतच 2024मध्ये आपणच पंतप्रधान होणार असल्याचा विश्वासदेखील व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी या लढ्याचा उल्लेख केला. पहिली सर्वात मोठी अपप्रवृत्ती म्हणजे भ्रष्टाचार असून देशातल्या सर्व समस्यांचे हे मूळ आहे. प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचारापासून मुक्तता, भ्रष्टाचाराविरोधात लढा ही काळाची गरज आहे. 2047पर्यंत विकसित भारताचे आपले स्वप्न साध्य करायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत जराही भ्रष्टाचार खपवून घेता कामा नये आणि हीच भावना आपण सदैव बाळगली पाहिजे. भ्रष्टाचाराविरोधातील लढा मी जारी ठेवेन, अशी हमी पंतप्रधानांनी दिली.

हेही वाचा – …तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद, भाजपची अट; वडेट्टीवारांच्या दाव्यानं खळबळ

- Advertisement -

घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचा नाश केला आहे. ही दुसरी अपप्रवृत्ती आहे. या घराणेशाही पद्धतीने देशाला जखडले असून सर्वसामान्यांचे हक्क हिरावले होते, असे मोदी यांनी सांगितले. तर, तिसरी दुष्प्रवृत्ती म्हणजे तुष्टीकरण आहे. तुष्टीकरणाने देशाची मूळ विचारधारा, सौहार्द या राष्ट्रीय भावनेला डाग लावला आहे. म्हणूनच या तीन दुष्प्रवृत्ती विरोधात आपण सर्व शक्तीनिशी लढा द्यायला हवा. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण यांना थारा मिळाल्याने देशातल्या जनतेच्या आकांक्षा दबल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Sanjay Raut : देश ‘त्या’ शुभ घटनेची वाट पाहतोय, संजय राऊतांचा आशावाद

यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. त्यांनी या दुष्प्रवृत्तींशी ‘लडने का तरीका’ सांगितला आहे. भ्रष्टाचाऱ्यांचा भारतीय जनता पक्षात समावेश करून, परिवारवादाच्या प्रतिनिधींचे भारतीय जनता पक्षात स्वागत करून, तर दंगलखोरांना आणि प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांना मोकळे रान देऊन ही लढाई लढता येईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -