Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला अटलबिहारी वाजपेयींचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला अटलबिहारी वाजपेयींचा विक्रम

सर्वाधिक काळ बिगर-काँग्रेसी पंतप्रधान

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मागे टाकत सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आपला संपूर्ण कार्यकाळ मिळून 2,268 दिवस देशाचे पंतप्रधान होते. ते आतापर्यंत सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधान पदावर राहणारे एकमेव बिगर-काँग्रेसी पंतप्रधान होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबतीत गुरुवारी त्यांना मागे टाकले आहे.

26 मे 2014 पासून मोदी पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. त्यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला आणखी मोठा विजय मिळाला आणि नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले.

- Advertisement -

अटल बिहारी वाजपेयी
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. ते पहिल्यांदा 1996 मध्ये पंतप्रधान झाले. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. यानंतर ते 1998 आणि 1999 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2004 पर्यंत सत्तेवर होते. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले.

सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविलेले जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू, हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. ते तब्बल 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत होते. तर दुसरा नंबर त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांचा लागतो. त्या 15 वर्षे 350 दिवस देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या खालोखाल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी विराजमान होते. त्यांनी १० वर्षे ४ दिवस देशाचे पंतप्रधानपद भूषवले.

- Advertisement -

सर्वात कमी काळ पंतप्रधान -गुलजारी लाल नंदा
सर्वात कमी काळ भारताच्या पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर आहे. लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर ते 11 जानेवारी 1966 पासून ते 24 जानेवारी 1966 पर्यंत 13 दिवसांसाठी हंगामी पंतप्रधान होते. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतरही ते 27 मे 1964 ते 9 जून 1964 पर्यंत हंगामी पंतप्रधान होते.

- Advertisement -