आई, ममता दीदी, झोप, राग आणि बरंच काही; अक्षयने उलडगले मोदींचे अंतरंग

narendra modi interact with akshay kumar
अक्षय कुमारने नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली

सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे तीन टप्पे उरकल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने एक मुलाखत घेतली. राजकीय गोष्टी वगळून मोदींच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल यावेळी मोदींना बोलते करण्याचा प्रयत्न अक्षयने केला. यावेळी आई, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दैनंदिन काम करत असताना झोप आणि रागावरचे नियंत्रण या आणि अशा अनेक गोष्टींवर मोदींचे मत अक्षयने जाणून घेतले.

माझी आई मला सव्वा रुपया देते

तुम्ही तुमच्या पगारातून आईला काही देता का? असा प्रश्न अक्षयने विचारल्यावर मोदी म्हणाले की, “माझ्या आईला माझ्याकडून घेण्याची कोणतीही गरज नाही. उलट तीच मला काही ना काही देते. आजही मी तिला भेटलो की ती माल सव्वा रुपया देते.”

राजकारणात काम करत असताना विरोधकांसोबत संबंध कसे जपता? असाही प्रश्न अक्षयने विचारला होता. त्यावर मोदी म्हणाले की, गुलाम नबी आझाद माझे चांगले मित्र आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माझ्यासाठी कुर्ते पाठवतात. तर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मला बंगाली मिठाई पाठवतात, असा गौप्यस्फोट मोदी यांनी केला.

मुख्यमंत्री होण्याआधी स्वतःचे कपडे मीच धुवायचो

“मी गुजरातचा मुख्यमंत्री होण्याअगोदर स्वतःचे कपडे स्वतःच धुत होतो. त्यावेळी मोठ्या बाहूचे कुर्ते धुवायला वेळ लागायचा. म्हणून मी अर्ध्या बाहूचे कुर्ते घालायला सुरुवात केली. आज माझ्या कपड्यांची चर्चा जगभरात होत असली तरी हे सत्य आहे की मी स्वतःच कपडे धुत होतो. व्यवस्थित कपडे घालण्याची फार पूर्वीपासूनच मला सवय आहे. तेव्हा एका तांब्यात गरम पाणी टाकून मी कपड्यांना इस्त्री करायचो”, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. अभिनेता अक्षय कुमारने मोदींच्या खासगी आयुष्याविषयी एक मुलाखत घेतली, या मुलाखतीमध्ये मोदींनी अनेक खुलासे केले आहेत.

या मुलाखतीमध्ये अक्षयने मोदींचा पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासाबाबतचे प्रश्न विचारले. मोदींनीही तेवढ्याच दिलखुलासपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. लहानपणी मला सन्यासी आणि सैनिक बनण्याची इच्छा होती. तसेच मी कुणालाच कमीपणा देऊन काम करत नाही. मला कुणावरही कधीच राग येत नाही, असेही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.