Homeदेश-विदेशPriyanka Gandhi on BJP : भ्याड लोकांच्या हाती सत्ता फार काळ राहात...

Priyanka Gandhi on BJP : भ्याड लोकांच्या हाती सत्ता फार काळ राहात नाही, प्रियंका गांधींचा भाजपावर घणाघात

Subscribe

भीती पसरवणारे स्वतःच भीतीचे बळी ठरतात. आज त्यांचीही स्थिती तशीच झाली आहे. चर्चेला घाबरतात, टीकेला घाबरतात. त्यांच्यात चर्चा करण्याची हिंमत नाही, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला.

(Priyanka Gandhi on BJP) नवी दिल्ली : लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान नवनिर्वाचित काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी प्रथमच भाषण करताना मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. प्रियंका गांधी 32 मिनिटे बोलल्या आणि त्यादरम्यान त्यांनी जात जनगणना, अदानी समस्या, देशाची एकता या मुद्द्यांसह देशातील परिस्थितीबाबत भाष्य केले. भ्याड लोकांच्या हाती फार काळ सत्ता राहात नाही, असेही त्यांनी सुनावले. (Priyanka Gandhi attacked BJP in the debate on the Constitution in the Lok Sabha)

लोकसभेत ‘भारतीय राज्यघटनेचा 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना प्रियंका गांधी यांनी पूर्णपणे मोदी सरकारला लक्ष्य केले. आपली राज्यघटना हा केवळ दस्तऐवज नाही तर, न्याय, आशा, अभिव्यक्ती आणि आकांक्षेची एक ज्योत असून ती प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात ही ज्योत आम्हाला दिसली आहे, असे सांगून प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख केला. पुस्तकातून त्यांचे नाव पुसले जाऊ शकते, भाषणातून पुसले जाऊ शकते, परंतु स्वातंत्र्य आणि देशाच्या उभारणीतील त्यांचे योगदान पुसले जाऊ शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – SS UBT Vs Fadnavis : गौतम अदानी सागर बंगल्यावर पोहोचले आणि…, ठाकरे गटाकडून फडणवीस लक्ष्य

या देशातील जनतेने निर्भयपणे देशाच्या सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले, त्यांना इशारा दिला आणि त्यांच्याकडून उत्तरे मागितली. पण, जिथे खुलेपणाने संवाद आणि अभिव्यक्तीचे कवच होते, तिथे भाजपाने भीतीचे वातावरण निर्माण केले. या देशातील प्रत्येक घराघरात, गल्लीबोळात आणि न्यायव्यवस्थेत चर्चा कधीच थांबल्या नाहीत, पण आज जनता सत्य बोललल्यावर तिला घाबरवण्यात येत आहे, धमकावले जात आहे. सर्वांना गप्प केले जात आहे. काहींवर ईडी, सीबीआय, आयकर विभागावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या सरकारने कोणालाही सोडले नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

ब्रिटिश राजवटीत देशात अशा प्रकारचे भीतीचे वातावरण होते, जेव्हा एका बाजूला गांधीवादी विचारधारा असलेले लोक स्वातंत्र्यासाठी लढत होते, तर दुसरीकडे लोक भयभीत होऊन इंग्रजांशी हातमिळवणी करत होते, असे सांगून, भीती पसरवणारे स्वतःच भीतीचे बळी ठरतात. आज त्यांचीही स्थिती तशीच झाली आहे. चर्चेला घाबरतात, टीकेला घाबरतात. त्यांच्यात चर्चा करण्याची हिंमत नाही, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला.

हा देश भीतीवर नाही, तर धैर्य आणि संघर्षावर उभा राहिला आहे. शेतकरी, मजूर अशा कोट्यवधी लोकांनी तसा बनवला आहे. हा देश धाकदपटशाने चालत नाही. भीतीचीही एक मर्यादा असते, जेव्हा भीती दाखवून दडपण्याचा प्रयत्न झाला तर, उसळी घेऊन उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. हा देश जास्त काळ भ्याडांच्या ताब्यात राहू शकत नाही. हा देश लढेल, सत्याची मागणी करेल, असे त्यांनी भाजपाला सुनावले.

राजाची गोष्ट सांगत मोदींवर निशाणा

प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान लहानपणीची एक गोष्ट सांगितली. एक राजा होता. तो वेषांतर करून तो लोकांमध्ये जात असे. जनता आपल्याबद्दल काय विचार करते, मी योग्य मार्गाने जात आहे ना, हे जाणून घेण्यासाठी तो असे करायचा. आमचा राजा वेष तर बदलत असतात, त्यांना तो शौकही आहे. पण लोकांमध्ये जाण्याची तसेच टीका सहन करण्याची हिंमत त्यांच्यात नाही, अशी कोपरखळी प्रियंका गांधी यांनी दिली. (Priyanka Gandhi on BJP: Priyanka Gandhi attacked BJP in the debate on the Constitution in the Lok Sabha)

हेही वाचा – SS UBT : बेरोजगारी हा जॉर्ज सोरोसपेक्षा महत्त्वाचा मुद्दा, ठाकरे गटाने भाजपाला सुनावले


Edited by Manoj S. Joshi