आता कुतुब मिनारचा वाद पेटणार, विष्णू स्तंभ असल्याचा दावा करत हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन

याआधीही कुतुबमिनार पूर्वी 'विष्णू स्तंभ' होता, असा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. सरकारने कुतुबमिनार संकुलातील प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी करावी आणि तेथे हिंदू विधी सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विहिंपने मागील महिन्यात केली होती.

देशभरात सध्या धार्मिक स्थळांवरून वादाचे वातावरण असताना आता यामध्ये आणखी एका वादाची भर पडली आहे. दिल्लीतील कुतुब मिनार हा विष्णू स्तंभ असल्याचा दावा करत हिंदुत्ववादी संघटनेने मंगळवारी या ठिकाणी आंदोलन करत हनुमान चालिसाचे वाचन केले. कुतुब मिनारचे नाव बदलण्याची मागणी करत दिल्ली शिवसेनेचे माजी प्रमुख जयभगवान गोयल यांच्या युनायटेड हिंदू फ्रंट या संघटनेने हे आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. या आंदोलनामुळे आता कुतुब मिनार नामांतरणाचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

हिदुत्ववादी संघटना युनायटेड हिंदू फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी कुतुब मिनार विष्णू स्तंभ असल्याचा दावा करत या ठिकाणी पुजेची परवानगी देण्याची मागणी केली. ही वास्तू कुतुबुद्दीने बांधली नसून सम्राट विक्रमादित्य यांनी बांधल्याचा दावा  करणारे पोस्टर आणि भगवा झेंडा यावेळी आंदोलकांनी हातात घेतले होते. यावेळी युनायटेड हिंदू फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी हातात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी गोयल आणि त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, याआधीही कुतुबमिनार पूर्वी ‘विष्णू स्तंभ’ होता, असा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. सरकारने कुतुबमिनार संकुलातील प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी करावी आणि तेथे हिंदू विधी सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विहिंपने मागील महिन्यात केली होती. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल आणि संघटनेच्या अन्य नेत्यांनी मागील महिन्यात येथे  भेट दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली. येथील 27 मंदिरे पाडल्यानंतर मिळालेल्या साहित्यातून कुतुबमिनार बांधण्यात आला, असा दावा विनोद बन्सल यांनी केला आहे. यापूर्वी तोडलेली 27 मंदिरे पुन्हा बांधून तेथे हिंदूंना पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यापूर्वी, माजी राज्यसभा खासदार तरुण विजय यांनी कुतुबमिनार संकुलात एका ठिकाणी पिंजऱ्यात गणेशाची उलटी मूर्ती ठेवून हिंदूंच्या भावनांचा अपमान केल्याचा आरोप  केला होता. त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकांना पत्र लिहून या मूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्याची मागणी केली होती.