देहविक्री बेकायदेशीर नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

sex racket busted in thane 4 woman released from prostitution

देहविक्री करणे बेकायदेशीर नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने गुरुवारी दिला. तसेच परस्पर संमतीने देहविक्रय व्यवसाय करणार्‍या महिलांची अडवणूक करण्याचा किंवा त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्याचप्रमाणे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणीदरम्यान म्हटले आहे. देहविक्रय हा एक व्यवसाय असून या व्यवसायामधील महिलांना त्यांचा सन्मान आणि कायद्याने पुरवलेल्या सुरक्षेचा समान अधिकार असल्याचेही सांगितले आहे.

यासंदर्भात दाखल करण्यात आलेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने गुरुवारी निकालात काढली. जेव्हा एखादी देहविक्रय करणारी महिला ही सज्ञान असेल आणि तिच्या इच्छेने शरीरसंबंध ठेवत असेल तेव्हा पोलिसांना त्या प्रकरणात पडण्याचा किंवा तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार नाही. हे सांगण्याची गरज नाही की, व्यवसाय कुठलाही असला तरी या देशातील प्रत्येक व्यक्तीला घटनेतील २१ व्या कलमानुसार सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे खंडपीठाने यावेळी निकाल देताना म्हटले.