नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक जी-20 शिखर परिषदेत (G20 Summit 2023) सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. आज, रविवारी सकाळी 6.30च्या सुमारास ते पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने त्यांचे स्वागत केले. अक्षरधाम मंदिरात त्यांनी पूजाविधी केला.
“I am hugely proud of my Indian roots and my connections to India … being a proud Hindu means I will always have a connection to India and the people of India.”
Prime Minister @RishiSunak and Mrs Murty visited Akshardham temple in New Delhi to offer prayers. pic.twitter.com/oAI2kIyqsb
— UK in India🇬🇧🇮🇳 (@UKinIndia) September 10, 2023
या मंदिराच्या पुजाऱ्याने सुमारे 100 एकरवर उभे असलेले आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकूल असलेले अक्षरधाम मंदिर ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांना दाखवले. या दाम्पत्याने तिथे सुमारे 40 मिनिटे घालवली. अक्षरधाम मंदिराच्या भेटीच्या फोटोसह ऋषी सुनक यांचे याबाबतचे वक्तव्य ब्रिटिश उच्चायुक्तालयाने ट्विटरवर शेअर केले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान दर्शनासाठी येणार असल्याने संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ऋषी सुनक यांनी काल, शनिवारी पहिल्या दिवशीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या पंतप्रधान निवासस्थानी द्विपक्षीय चर्चा केली. तसेच, भारत मंडपम येथे G20 शिखर परिषदेला ते उपस्थित होते. तर, रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही ते उपस्थित राहिले.
हेही वाचा – सरकारचे हे कामही 50% कमिशनवर होते का? जी-20च्या गैरव्यवस्थापनावरून काँग्रेसचा निशाणा
भारताशी असलेले नाते अभिमानास्पद : ऋषी सुनक
भारतीय वंशाचा असल्याचा तसेच या देशाशी विशेष नाते असल्याचा मला खूप अभिमान आहे. भारत आणि भारतीयांशी वाटणारी आपुलकी हाच हिंदू असल्याचा गर्व असल्याचे वक्तव्य ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केले आहे. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीचे प्रमुख नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत.