PUBG च्या नादात पोराने वडिलांच्या खात्यातून उडवले १६ लाख रुपये!

ऑनलाईन अभ्यासासाठी दिला होता वडिलांनी मुलाला मोबाईल

भारत सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे, या यादीमध्ये टिकटॉकनंतर पबजी हे भारतातील सर्वात लोकप्रिय अॅप आहे, टिकटॉकनंतर सोशल मीडियावर पबजीला बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. मात्र पबजीवर बंदी घालण्याची मागणी चीनचे कनेक्शन नाही तर पबजीचे व्यसन लागलेल्या लोकांची संख्या कमी व्हावी हे एकच कारण आहे.

नुकताच एक प्रकार असा घडला की, जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल, एका १७ वर्षांच्या मुलाने पबजी या मोबाईल गेमच्या नादात आपल्या वडिलांच्या खात्यातील एक दोन नाही तर तब्बल १६ लाख रूपये उडवले आहेत. ही घटना पंजाब मधील खऱड येथील आहे.

वैद्यकीय खर्चासाठी ठेवलेले पैसे पबजीवर उडवले

‘ट्रिब्यून इंडिया’ च्या अहवालानुसार मुलाच्या वडिलांनी हे पैसे वैद्यकीय खर्चासाठी ठेवले होते, जे मुलाने आपल्या पबजी अकाऊंटला अपग्रेड करण्यासाठी खर्च केले. अहवालात असे नमूद केले आहे की, मुलाने आपल्या मित्रांचे पबजी अकाऊंटही अपग्रेड करण्यासाठीही त्याने हे पैसे खर्च केले आहेत. बँकेच्या स्टेटमेंटमधून पैशांच्या खर्चाची माहिती वडिलांनी मिळवली तेव्हा हा प्रकार उघड झाला आहे.

या मुलाचे वडील एक सरकारी कर्मचारी आहेत. मुलाच्या वडिलांनी सांगितले की ते नोकरीसाठी राहतात आणि त्याचे मुल त्याच्या आईसह गावात राहतो. दरम्यान मुलाने आईच्या फोनवरून सर्व व्यवहार केले असल्याचे सांगितले जात आहे “मुलगा सर्व ट्रान्जेक्शन आपल्या आईच्या मोबाईलवरुन करत होता आणि बँक रीलेटेड सर्व मेसेज डिलिट करत होता”, असे मुलाच्या वडिलांनी सांगितले.

ऑनलाईन अभ्यासासाठी दिला होता मोबाईल

मुलाच्या कुटुंबियांना वाटत होत की, त्यांचा मुलगा स्मार्टफोनचा सर्वाधिक उपयोग आपल्या ऑनलाईन अभ्यासासाठी करत आहे. पण आता या घटनेनंतर कुटुंबियांनी मुलाला मोबाईल रिपेअरिंग दुकानावर कामाला लावले आहे. जेणेकरुन तो मोबाईलवर PUBG गेम खेळू शकणार नाही.

पबजी मोबाईल गेमच्या व्यसनाची ही पहिली बातमी नाही. यापूर्वीही असे अहवाल समोर आले आहेत. गेल्या वर्षी, एक मुलगा पब्जी गेम खेळण्यात इतका गुंतून गेला होता की त्याने पाण्याऐवजी अॅसिड प्यायले होते. याशिवाय पबजी खेळल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील मुलाची मानसिक स्थिती बिकट झाल्याचे देखील समोर आले होते.


कुत्र्याला कोरोनाची लागण; संसर्ग वाढू नये म्हणून केलं ठार!