पुलवामा हल्ला… राजस्थानमध्ये काँग्रेसच्या नेत्याने पुन्हा व्यक्त केला संशय

नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर रंधावा यांच्या वक्तव्यावरून जोरदार वादंग सुरू झाले आहे. पुलवामा हल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजस्थानातील राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पुलवामा हल्ला घडवून तर आणला नव्हता ना? असा सवाल सुखजिंदर रंधावा यांनी केला आहे.

सन 2019मध्ये पुलवामा हल्ला झाला होता. त्याबाबत काही काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी देखील विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. आता पुन्हा राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा हल्ला निवडणूक जिंकण्यासाठी तर केला नाही ना? असा सवाल करत, पुलवामा हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर, रंधावा यांनी देश आणि पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.

गटबाजी आणि आपापसातील भांडणे संपवा, म्हणजे मोदी आणि भाजपा आपोआप संपुष्टात येईल, असा सल्लाही रंधवा यांनी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला. झिंदाबादच्या घोषणांमुळे नेत्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली. हिंडेनबर्ग अहवालावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान रंधावा म्हणाले, आपण आपल्या पक्षातील अंतर्गत वाद मिटवला पाहिजे.

या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेद चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, मी सर्व नेत्यांना विनंती करतो की, आपापसातील भांडणे थांबवा आणि मोदी सरकारला संपवण्याचा विचार करा. आपण मोदी सरकार संपवू शकलो, तर भारत वाचवू शकतो.