घरताज्या घडामोडीPM Modi security breach : पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या त्रुटीच्या घटनेचे गल्ली ते दिल्ली...

PM Modi security breach : पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या त्रुटीच्या घटनेचे गल्ली ते दिल्ली उमटले पडसाद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षा व्यवस्थेतील चुकांच्या प्रकरणाचे पडसाद हे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत उमटले. या मुद्द्यावर एकीकडे पंजाब सरकारपासून ते कॉंग्रेसने खिंड लढवली, तर दुसरीकडे भाजपकडूनही या मुद्द्यावर प्रत्युत्तर देण्यात आले. या प्रकरणातील सुरक्षेच्या मुद्द्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. तर कॉंग्रेसकडूनही या घटनेबाबतची माहिती कॉंग्रेस सुप्रिमो सोनिया गांधींना ब्रीफ करण्यात आली आहे. खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी कॉल करत सोनिया गांधींना घडलेल्या घटनेबाबतची माहिती दिली. त्यानंतर खुद्द सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत, चरणजीत सिंह चन्नी यांना काही सूचना केल्या आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या सुरक्षेची काळजी पहिल्यांदा घ्या अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. सुरक्षेच्या व्यवस्थेतील त्रुटींच्या मुद्द्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या खंडपिठापुढे सुनावणी होणार आहे. आज दिवसभरात मुंबईतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यासोबतच राजकीय हेवेदावेही दिवसभरात मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहायला मिळाले.

काय घडले दिवसभरात ?

सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या मुख्य सचिवांना तसेच पोलीस महासंचालकांना या घटनेतील जबाबदार असलेल्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच असा प्रकार पुन्हा होता काम नये, असेही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायलयात सरन्यायाधीस एनव्ही रमणा यांच्या खंडपिठासमोर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

पंजाब सरकारने नेमली दोन सदस्यीय चौकशी समिती

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत पंजाब सरकारने दोन सदस्यीस समिती नेमली आहे. त्यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती मेहताब गिल आणि पंजाबच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अनुराग वर्मा यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली आहे. येत्या तीन दिवसात समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान राष्ट्रपती भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन दिल्ली येथे आज भेट घेतली. या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा यंत्रणेशी संबंधित झालेल्या घटनेबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली. खुद्द राष्ट्रपतींनीही झालेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

गृहमंत्रालयाचा पंजाब पोलिसांवर निशाणा

आज सकाळी गृह मंत्रालयानेही पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांच्या मार्गात विनाअडथळा मार्ग निर्माण करण्यात अपयश आल्याचे म्हटले. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणाबाबतची आणि मार्गाची माहिती देणे गरजेचे होते. तसेच पर्यायी मार्गाने पंतप्रधानांचा ताफा जाईल यासाठीची व्यवस्था करणे गरजेचे होते असेही गृहमंत्रालयाने म्हटले.

राजकीय आरोप प्रत्यारोप

भाजपकडून आरोप करताना स्मृती इराणी म्हणाल्या की अशा प्रकारच्या कॉंग्रेसच्या राजकीय खेळीतून पंतप्रधानांना मारून टाकण्याचा डाव होता. कॉंग्रेस पंतप्रधानांचा तिरस्कार करतेच, पण त्यांच्या जिवाला धोका पोहचवण्याचा हा प्रयत्न होता असाही आरोप त्यांनी केला. त्यावर कॉंग्रेसच्या रणदीप सुरजेवाला यांनी पलटवार करत म्हटले की, पंतप्रधांनासाठी जो नियोजित मार्ग होता त्यासाठीचे व्यवस्थापन करण्यात आले होते. पंतप्रधानांनी निवडलेल्या पर्यायी मार्गाचे उल्लेख हा मूळ नियोजनात कुठेही नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंजाबच्या घटनेचे पडसाद मुंबईतही

पंजाबमध्ये घडलेल्या घटनेचा पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. मोदींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीचा निषेध करण्यासाठी आज भाजपचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या दादरमधील कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले होते. यावेळी पोलिसांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीची नाराजी व्यक्त करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे आंदोलन मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवन परिसरात झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपच्या या युवा मोर्चामध्ये मुलींचा देखील समावेश होता.

PM Modi security lapse: पंजाबच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात, भाजपचा काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -