घरAssembly Battle 2022Punjab Election Results 2022- पंजाब मध्ये 'आप'च्या झाडूने केला काँग्रेस,भाजपचा सुपडा साफ

Punjab Election Results 2022- पंजाब मध्ये ‘आप’च्या झाडूने केला काँग्रेस,भाजपचा सुपडा साफ

Subscribe

यामुळे पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून आपचे भगवंत मान यांच्या नावाची घोषणा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

पंजाबमध्ये आप पक्षाने जोरदार मुसंडी मारत ११७ जागांपैकी ९३ जागा मिळवल्या आहेत. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराजय झाला असून मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नीदेखील पिछाडीवर आहेत. यामुळे पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून आपचे भगवंत मान यांच्या नावाची घोषणा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आपच्या पंजाबमधील या विजयाने इतिहास घडवला आहे.

यामुळे बहुजन समाज पार्टीबरोबर युती करून पंजाबची सत्ता मिळवण्याचे अकाली दलाचे स्वप्न मात्र भंगले आहे. तर गेल्या विधान सभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आलेल्या आप पार्टीने यावेळी पंजाबची सत्ता काबिज करण्याचे पाहीलेलं स्वप्न जवळपास पूर्ण झाले आहे. यादरम्यान, सर्वांच्या नजरा टिकल्या होत्या त्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नवीन पार्टी असलेल्या पंजाब लोक काँग्रेसकडे. कारण विजय मिळवण्याच्या दृष्टीने अमरिंदर यांच्या पंजाब लोक काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग ढींढसा यांच्या शिरोमणी अकाली दलाबरोबर युती केली होती. यामुळे जनतेचा कौल त्यांना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

- Advertisement -

तर दुसरीकडे यावेळी पंजाबमधील निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधले होते ते ज्येष्ठ शेतकरी नेते असलेल्या बलबीर सिंग राजेवाल यांच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेल्या संयुक्त समाज मोर्चाकडे . जो शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या २२ शेतकरी संघटनांनी एकत्र येत बनवलेला पक्ष आहे. पण आपने सगळ्या शक्यता अशक्यतांवर मात केली असून पंजाबमध्ये विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

पंजाबमध्ये आपच्या झाडूने काँग्रेससह भाजप व इतर पक्षांचा सुपडा साफ केला आहे. पण आप ला मिळालेला हा विजय दिसतो तेवढा सोपा नाही. आप सारख्या काही वर्षांपूर्वीच नव्याने आकारास आलेल्या पक्षाने एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या जुन्या काँग्रेस पक्षाला पराभवाची धूळ चारली आहे. यासाठी मुख्य कारण ठरले आहे ते पंजाबमधील काँग्रेस पक्षाचे अंतर्गत राजकारण आणि शेतकरी आंदोलन.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना पंजाबमधील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. तर हे कृषी कायदे शेतकऱ्यांपेक्षा श्रीमंताच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप पंजाबमधील शेतकऱ्यांनी केला होता. हे आंदोलन जवळ जवळ दीड वर्ष सुरू होते. पण मोदी सरकारही आपल्या मतावर अडून बसले होते. तर जोपर्यंत कृषी कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय घेत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी केंद्र सरकारच्या आदेशांवर लाठीचार्ज केला. यात अनेकांची डोकी फुटली तर काहींच्या हातापायांचे हाडेही मोडली तर काहीजणांचा जीवही गेला. पण किसान संयुक्त मोर्चाचे प्रमुख राकेश टीकैत आपल्या मागण्यांवर ठाम होते. मोदी सरकारच्या या हुकुमशाहीमुळे शेतकरी भाजपवर नाराज झाले. यादरम्यान, दिल्लीच्या सिंघु बोर्डरवर दिल्ली पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना यावेळी साथ दिली ती आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी. त्याचीच परतफेड पंजाबच्या जनतेने केली असून आप ला भरघोस मत देऊन राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

तर काँग्रेसच्या अंतर्गत वादाचाही परिणाम पंजाबमधील जनतेवर झाला हे आज स्पष्ट झालं आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला आलेल्या अपयशाचं खापरं क्रिकेटर आणि भाजपला राम राम करत काँग्रेसवासी झालेल्या नवज्योतसिंग सि्दधू यांच्यावर फोडलं जात आहे. सिद्धू यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बनवलं होतं. हे मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुळीच आवडले नव्हते. आपल्या बडबोल्या व उद्धट आणि उर्मट स्वभावामुळे सिद्धूचे कधीही अमरिंदर सिंग यांच्याबरोबर पटले नाही. त्यातच सिद्धू यांनी पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान इम्रान खान व पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवाव यांची घेतलेली भेट सिंग यांना रुचली नव्हती. भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात जाऊन सिद्धूने शहीदांचा अपमान केल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. त्यासंदर्भात त्यांनी काँग्रेस सुप्रिमो सोनिया गांधी आणि राहुल गाधी यांना पत्र लिहले. पण त्यावर या दोघांनी कोणतही समाधानकारक उत्तर सिंग यांना दिलं नाही. यामुळे पक्षात आपल्याला आधीसारखा मान सन्मान मिळत नसल्याचे सांगत सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने दलित वर्गातील चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. विशेष म्हणजे आतापर्यंत पंजाबमध्ये झालेले मुख्यमंत्री हे जाट शीख कुटुंबाशी संबंधित होते. कारण पंजाबमध्ये शीख समाज ६३ टक्के आहे. तसेच शीख धर्म जाती भेद मानत नसला तरी १८८१ ते १९२१ पर्यंत इंग्रजांच्या काळातील जनगणनेत शीख समाजात खत्री, अहुलीवाया ,जाट, अरोरा, अशा सुमारे २५ जातींचा समावेश करण्यात आला होता. परिणामी पंजाबच्या राजकारणावर जाट शिखांची पकड आहे. याचपार्श्वभूमीवर पंजाबचे आजपर्यंतचे सर्व मुख्यमंत्री जाट समाजातील होते. पण ग्यानी झैलसिंग आणि मुख्यमंत्री चरणजित चन्नी हे याला अपवाद ठरले आहेत. यामुळे चन्नी यांच्या माध्यमातून काँग्रेसने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत दलित कार्ड खेळल्याची चर्चा सुरू झाली. पंजाब हे असे राज्य आहे जिथे दलित समाजाची संख्या सर्वाधिक म्हणजे सुमारे ३० टक्के आहे. हेच हेरून चन्नी यांना मुखमंत्रीपद देण्यात आल्याची राजकारणात चर्चा होती.

दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी स्वता:चा वेगळा पक्ष स्थापन केला. पंजाबमधलं राजकारण बघत त्यांनी भाजपबरोबर युती केली. तर यावेळी पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि बहुजन पार्टीही युती करत निवडणूकीच्या रिंगणात उतरली. तसेच शेतकरी आंदोलनानंतर बनवण्यात आलेला संयुक्त समाज मोर्चा हा पक्षही शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरला. तर दिल्लीनंतर इतर राज्यात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पार्टीने पंजाबच्या राजकारणात कट्टर विरोधक म्हणून एन्ट्री केली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी कॉमेडियन कलाकार असलेल्या भगवंत मान यांना पंजाबमधून लढण्याची संधी दिली. भगवंत मान हे पंजाबमध्ये लोकप्रिय तर आहेतच. शिवाय त्यांचा फॅनफोलोईंग हा तरुण वर्ग असल्याचा फायदा आप ला या निवडणुकीत झाला. एक प्रामाणिक व्यक्ती आणि नेता अशी मान यांची पंजाबमध्ये छवी आहे. मान हे जवळजवळ दोन दशकांपासून राजकारणात असूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा पुसटसा डागही नाही. तसेच मान हे मालवा क्षेत्रातील असून एका सामान्य जाट शीख कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. यामुळे सामान्य नागरिकांशी त्यांची नाळ जुळलेली आहे. हे ओळखत केजरीवाल यांनी मान यांना पंजाबच्या राजकारणात उतरवले. ज्याचा त्यांना फायदा झाला असून पंजाबचे भावी मुख्यमंत्री म्हणून मान यांच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्लीनंतर केजरीवाल यांच्या आपने पंजाबमध्ये सत्ता स्थापित केल्याने मोदी सरकार विरोधी नेत्यांच्या यादीत एका नव्या नेत्याची भर पडली आहे. येणाऱ्या काळात मोदी सरकार आप ला किती सहकार्य करते की सळो की पळो करून सोडते हे पाहायला मिळणार आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -