गँगस्टर लंडा हरिकेने स्वीकारली सुधीर सुरी यांच्या हत्येची जबाबदारी, सोशल मीडियावर फेसबूक पोस्ट व्हायरल

अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर आणि दहशतवादी लंडा हरिकेने स्वीकारल्याचे समजते. या संदर्भातील एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये हत्येची जबाबदारी घेत गँगस्टर लंडा हरिकेने ही फक्त सुरुवात असल्याचे सांगितले.

अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर आणि दहशतवादी लंडा हरिकेने स्वीकारल्याचे समजते. या संदर्भातील एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये हत्येची जबाबदारी घेत गँगस्टर लंडा हरिकेने ही फक्त सुरुवात असल्याचे सांगितले. तसेच, सुरक्षा असल्याने आपला बचाव होईल, अशा भ्रमात राहणाऱ्यांनो आता तुमची वेळी आहे, हेही ध्यानात ठेवावे, असेही या पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र, ही पोस्ट खरी आहे की खोटी हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत सध्या सायबर सेल काम करत आहे.

या फेसबूक पोस्टबाबत ‘न्यजू 18 इंडिया’ या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, ज्या आयपी अॅड्रेसवरून ही पोस्ट टाकण्यात आली आहे त्यावर सायबर सेल काम करत आहे. कारण पोस्ट टाकून स्क्रीनशॉट टाकला आहे आणि आता ती पोस्ट डिलीट करण्यात आली आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी सांगितले की, अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येचा सर्व बाजूंनी तपास केला जाणार आहे. शहरातील सर्वात वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मजिठा रोडवरील गोपाळ मंदिराबाहेर शुक्रवारी सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जिथे ते आणि त्यांच्या पक्षाचे इतर काही नेते आंदोलन करत होते. त्यानंतर सुरी यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

याशिवाय, या हत्येप्रकरणी हल्लेखोराला घटनास्थळी अटक करण्यात आली असून, हल्लेखोराविरुद्ध कलम 302 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत हत्येमागील कट आणि या घटनेमागे सहभागी असलेल्या सर्व अंगांनी तपास केला जात असल्याचे पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे परिस्थिती नियंत्रणात असून, लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. खोटी आणि अपूर्ण माहिती पसरवू नका, अन्यथा त्यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रसारमाध्यमांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेत खलिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना यादव म्हणाले की, हा तपासाचा प्राथमिक टप्पा असून आम्ही सर्व गोष्टींच्या तळापर्यंत जाऊ. सुरीच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण दिले जाईल आणि शांतता आणि सलोखा राखण्याला पोलिसांचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.