दुकानांवर तोबा गर्दी; आता दारू मिळणार घरपोच!

liquor-delivery-in_home

देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दारूची विक्री करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर काय घडलं, हे आख्ख्या देशानं पाहिलं. अनेक वाईन शॉप्सबाहेर तळीरामांची गर्दी झाली, काही ठिकाणी झुंबड उडाली. सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. त्यामुळे नाशिक, मुंबईसारख्या ठिकाणी शिथिल केलेले नियम पुन्हा पूर्ववत करत दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. त्यामुळे सरकारी तिजोरीत मोठी भर टाकणारी मद्यविक्री तळीरामांच्या आधाशीपणामुळे पुन्हा बंद करावी लागल्यामुळे आता सरकारला पैसा कुठून आणि कसा मिळणार? हा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आता दारूची घरपोच विक्री होणार असल्याची बातमी आली आहे. पण थांबा, ही होम डिलीव्हरी काही महाराष्ट्रात नाही बरं का! पंजाब सरकारनं हा निर्णय घेतला आहे!

दारूच्या दुकानांवर होणारी गर्दी पाहाता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, अमरिंदर सिंग यांनीच सर्वप्रथम दारूची दुकानं उघडण्याची परवानगी देण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती. दारूविक्री बंद असल्यामुळे पंजाब राज्याला महिन्याला ५०० कोटींचा फटका बसत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीसाठी आवश्यक अशा दारूविक्रीसाठी पंजाब सरकारनं अखेर दारूच्या होम डिलीव्हरीचा पर्याय जाहीर केला आहे.

कशी होईल होम डिलीव्हरी?

आत्तापर्यंत किराणा वगैरेसारख्या जीवनावश्यक बाबींचीच होम डिलीव्हरी लॉकडाऊनच्या काळात होत असताना पंजाबमध्ये आता दारूचीही होम डिलीव्हरी होणार आहे. गुरुवारी ७ मेपासून तळीरामांना मद्याची ऑर्डर देता येणार आहे. दुपारी १ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे. यासाठी दारूची दुकानं सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत खुली राहणार आहेत. त्यांच्याकडे ऑर्डर नोंद झाल्यानंतर दुपारच्या १ ते ६ वाजेपर्यंत ही होम डिलीव्हरी संबंधित दुकानदाराकडून केली जाणार आहे. ही सुविधा फक्त पंजाब राज्यापुरतीच मर्यादित असणार आहे. दरम्यान, पंजाब सरकारच्या या निर्णयानंतर आता इतर राज्यांमध्ये देखील ‘इच्छुकां’कडून होम डिलीव्हरीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.